पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
भारतीय लोकसत्ता

विरुद्ध भारतांत कधीहि कोणी संग्राम केला नाही, हे इतिहासच सांगतो आहे. इ. स. एक हजारपासून येथे अत्यंत भयानक असे मुसलमानांचे आक्रमण सुरू झाले. सर्व दक्षिण हिंदुस्थान पंधरावीस वर्षांत मुसलमानांनी पायतळीं घातला. संपत्ति लुटून नेली. स्त्रिया भ्रष्ट केल्या. मंदिरे पाडून टाकलीं. मूर्ति फोडून टाकल्या. या वेळी राजसत्ता चुरमुऱ्याच्या पोत्यासारख्या कोलमडल्या. पण या ग्रामपंचायतीचें तरी काय झाले? त्या जिवंत राहिल्या; पण या आक्रमणाला त्यांनी पायबंद घातला काय? ज्या गुरूचा, देवाचा, धर्माचा, मंदिराचा अभिमान भारतीय जनतेला होता, त्यांच्यावर सतत तीनचारशें वर्षे अखिल हिंदुस्थानांत सारखा जुलूम चालू होता. त्यांचा विध्वंस चालू होता. खेडींच्या खेडी इस्लामीयांनी बाटविली, तेथील स्त्रिया पळवून नेल्या, जमिनी हिरावून घेतल्या. त्या वेळी या अन्यायाचा प्रतिकार करण्याचें सामर्थ्य एकदा तरी या ग्रामपंचायतींनी प्रकट केले काय? पुढे खिस्ती लोक आले. त्यांनीं बकऱ्यामेंढरासारखे लोकांना कापून काढले, बाटविलें; तरी ग्रामपंचायती जिवंतच होत्या! आणि त्या लोकायत्त होत्या! आणि तीं आमची प्रजासत्ताक राज्ये होतीं! बंगालमध्ये कंपनी सरकारच्या जुलमामुळे लक्षावधी लोक अन्नान्न करून मरत. खेडींच्या खेडी उध्वस्त होत, त्यांची स्मशानें होत. या ग्रामसंस्था त्या काळांतहि टिकून राहिल्या होत्या!
 भारतांतील ग्रामपंचायतींचे स्वरूप हें असें आहे. त्यांचा कांहीं वारेमाप गौरव करण्याने नव्या पिढीची भलतीच दिशाभूल होईल हे आपण ध्यानांत ठेवले पाहिजे. लोकशाहीचा खरा अर्थ अशा गौरवाने त्यांना कळणार नाहीं. लोकशाही हें एक सामर्थ्य आहे, चैतन्य आहे, ही जाणीव त्यांना होणार नाहीं. व्यक्तिमत्त्व- सर्व सामर्थ्याने संपन्न, क्रान्तिवृत्तीनें सळसळणारें, अन्यायाच्या प्रतीकारार्थ उसळून उठणारें,- असे व्यक्तिमत्व हा लोकशाहीचा आत्मा आहे; हा भावार्य त्यांच्या चित्तांत रुजणार नाही. यासाठी आपण सावध राहिले पाहिजे आणि प्राचीन भारतांतील लोकसत्तेचा गौरव करतांना पूर्वजांच्या अभिमानानें अंध होता कामा नये. लोक एकत्र आले, त्यांनीं कांहीं सभा घेतल्या आणि तलाव, विहिरी, मंदिरें, जंगले यांचा कारभार समाईकीने पाहिला म्हणजे तेवढ्याने ती लोकसत्ता होत नाहीं. आम्ही लोक म्हणजे सार्वभौम सत्तेचे स्वामी आहो. राजसत्ता, धर्मसत्ता, वरिष्ठसत्ता व धनिक-