पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्वांतून, निर्माण झालेली शासनपद्धति आहे. अहंकाराच्या या प्रबल स्फुरणांतून फार मोठे सामर्थ्य निर्माण होत असतें. (ॲटम्) एक अणु हा पदार्थातील इतर अणूपासून पृथक् केल्याबरोबर त्याच्यांतून जसें अपार सामर्थ्य निर्माण झाल्याचे आपण पाहिले व पहातों त्याचप्रमाणे एकंदर जनसमूहांतून आपण एक पृथक् व्यक्ति आहोत अशा स्वतंत्र अहंकाराची जाणीव व्यक्तीला होतांच तिच्या ठायीं अपार सामर्थ्य निर्माण झाल्याचे आपल्या प्रत्ययास आले पाहिजे, अशी व्यक्ति मग कसल्याहि प्रकारचा अन्याय, जुलूम, कसलीहि सुलतानी, अरेरावी सहन करणार नाहीं. या अन्यायाच्या सुलतानीच्या प्रतीकारार्थ ती नेहमीं सिद्ध राहील आणि त्या लढ्यांत जरूर तर आत्मबलिदान करील. कारण व्यक्तिमत्वसंपन्न मनुष्याला तशा स्थितीत जगणे अशक्य असतें. ही जी त्याची वृत्ति हेच त्याचें व समाजाचे सामर्थ्य होय. अशा तऱ्हेचें व्यक्तित्वाचें सामर्थ्य भारतांतील ग्रामीण जनतेत या ग्रामपंचायतींच्या हजारों वर्षांच्या संस्काराने निर्माण झाले होते काय असा प्रश्न आहे. आणि त्याचे उत्तर, 'मुळींच झाले नव्हते.' असे आहे. हजारों वर्षे या ग्रामीण जनतेने अत्यंत जाचक अशीं बंधनें खालीं मान घालून सहन केलीं आहेत. ब्राह्मण- क्षत्रियांचे वर्चस्व तर तिने सहन केलेच; पण हिंदुस्थानांत जातींची स्वतःचीं बंधनें कांहीं थोडीं नसत. आणि जातींच्या प्रमुखांनीं त्या जातीच्या पंचायतींनी घातलेलीं बंधनें वरिष्ठ वर्गांनी लादलेल्या बंधनापेक्षांहि जास्त जाचक असत; पण त्यांच्याविरुद्ध कधीहि कोणी बंड केले नाहीं. या ग्रामसंस्थेत अस्पृश्य, चांडाल यांनाहि प्रवेश असे असे सांगतात. असेलहि; पण त्यामुळे आपण एक इतरांच्या सारखेच, ब्राह्मण क्षत्रियांच्या तोडीचेच नागरिक आहो असे स्फुरण त्यांच्या ठायीं झाले काय? कधींहि झाले नाहीं. धर्माच्या क्षेत्रांत गुरुवचनप्रामाण्य, गुरुची अगदीं गुलामगिरीसारखी भक्ति व सेवा हे हिंदुसमाजाचे लक्षण आहे. हे या ग्रामीण जनतेने कधी दूर केले काय? युरोपमध्ये ग्रीक विद्येचे पुनरुज्जीवन होतांच लोकांनी पहिला हल्ला पोपवर केला आणि या शब्दप्रामाण्याच्या बंधनांतून त्यांचा मन:- पिंड मुक्त झाला, तेव्हांच त्यांच्या ठायीं लोकसत्ता पेलण्याचे सामर्थ्य आलें. जातिबंधनें व धर्मबंधनें यांच्याप्रमाणेच राजसत्तेचीं बंधनें होती. त्यांच्या