पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

सत्ता या सर्व आमच्या हाती असल्या पाहिजेत आणि त्या न येतील तर प्राणपणानें आम्ही त्यासाठी लढा करूं ही वृत्ति म्हणजे लोकसत्ता होय. लोकशाही म्हणजे केवळ एक विशिष्ट शासनपद्धति नसून ती एक मनोवृत्ति आहे, असे प्रेसिडेंट विल्सन यांनी जे म्हटले आहे त्याचा हा अर्थ आहे. ही वृत्ति भारताच्या ग्रामपंचायतींतून कधीहि निर्माण झाली नाहीं. आणि त्यामुळे केवळ जडयंत्रणा सिद्ध झाली, तरी तेवढ्यावरून या ग्रामपंचायतींना लोकशाही ही थोर पदवी प्राप्त होणार नाहीं.
 सध्यां खेडीं आणि खेडूत यांविषयीं कांहीं भोळी श्रद्धा बाळगण्याची चाल पडत आहे. चिकित्सक वृत्ति कोठेंहि कमी झाली कीं, ते घातकच ठरतें. या बाबतींत तसेच होण्याचा संभव आहे. म्हणून मॅक् आयव्हर याने ग्रीक लोकसत्तेचे विवेचन करतांना खेडे व शहर यांच्या भिन्न संस्कृतींचे मोठे उद्बोधक विवेचन केले आहे, ते सारार्थाने येथे देतो. तो म्हणतो, 'खेड्यांतील जीवन जास्त पराधीन असते. निसर्ग हा अनियंत्रित आहे. याची नित्य जाणीव तेथें होत असते. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या ऋतुमानाची सत्ता खेडुतांवर फार असते. निसर्गाच्या या अनियंत्रित सत्तेमुळे खेड्यांतील लोक जास्त दैववादी व क्रान्तिविमुख असतात. शहरांचे तसे नाहीं. निसर्गाचे आपण दास आहोत, ही जाणीव शहरांत क्वचितच होते. त्यामुळे व विद्येच्या प्रसारामुळे राजसत्तेची भीति शहरवासीयांत पुष्कळच कमी झालेली असते. त्यामुळे तो जास्त बुद्धिवादी, जास्त चिकित्सक असा झालेला असतो. या कारणाने नगर हे लोकसत्तांचे उगमस्थान होते. ग्राम तसे होऊं शकत नाहीं. ग्रामीण जीवनांतील लोकशाही ही राजकारणापासून अलित व असंघटित अशी असते. नागरी लोकसत्ता ही नित्यसत्ताकांक्षी, चिकित्सक व लढाऊवृत्तीची अशी असते. खेड्यांतील लोक हे 'प्रजा' असतात, तर शहरांतील लोक 'नागरिक' असतात. आणि या शब्दांतील विवक्षा अगदी ध्रुवभिन्न अशा आहेत.' सध्यां ग्रामीण जनतेला जे सर्वत्र महत्त्व देण्यांत येते त्याला विरोध दर्शवावा असा हे उद्गार अवतरून देण्यांत मुळींच हेतु नाहीं; तर तेथे लोकसत्तेच्या कल्पना रुजविण्यासाठीं कोणचे प्रयत्न केले पाहिजेत, खेडुतांचा मनःपिंडच बदलणे कसे अवश्य आहे, हे ध्यानांत यावे आणि प्राचीन काळच्या ग्रामपंचायतींची लोकसत्ता