पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६७
राजकीय पुनर्घटना

कारण विरुद्ध गट करण्यास पुरेसें होतें.' १७-९-५० च्या भारतज्योतीमध्ये पट्टाभींनीं 'दि ट्रुथ मस्ट बी नोन' या नांवाचा लेख लिहून काँग्रेसच्या सदस्यांची अनीति, क्षुद्र वृत्ति, व नग्न स्वार्थ हीं अगदीं प्रांजलपणें जनतेपुढे मांडली आहेत. आंध्र प्रांतांतील काँग्रेस कमिट्यांच्या अंतर्गत निवडणुकांविषयीं लिहितांना ते म्हणतात, 'अनीतीलाहि कांहीं सीमा असते, पण आंध्रमधील घटनांनीं अनीतीच्या सर्व ज्ञात मर्यादा ओलांडल्या आहेत.'
 काँग्रेसची विघटना कोणत्या थरास जाऊन पोचली आहे याची या हकीकतीवरून व काँग्रेस श्रेष्ठींच्या टीकेवरून कल्पना येईल. यावरून एका अत्यंत दुःखद निर्णयाप्रत आपण येऊन पोंचतों, लोकजागृतीची विद्या आपण हस्तगत केली असली आणि त्या दृष्टीने आपण यशस्वी झालों असलो तरी व्यक्तित्वजागृत अशा लोकांची संघटना करण्याची विद्या अजून आपल्याला वश झालेली नाहीं. राजकीय पुनर्घटनेचे हें दुसरे अंग अजून अत्यंत विकल असेंच आहे. ते पुष्ट होऊन त्यांत प्राणशक्तीचा संचार होईपर्यंत, पहिले अंग कितीहि परिपुष्ट झाले असले तरी, राष्ट्रीय उन्नतीचे कार्य, लोकसत्तेच्या दृढीकरणाचे ध्येय साध्य होण्याची यत्किंचितहि आशा धरतां येणार नाहीं हें अगदी उघड आहे.

सर्व समाजच रोगग्रस्त

 पण यावेळी भारताच्या नागरिकांनी अत्यंत सावधगिरीने विचार करणे अवश्य आहे. काँग्रेसजनांची स्वार्थपरायणता, क्षुद्रवृत्ति व हीन आचरण पाहून मन उद्वेगून व भडकून जाणे अगदी सहाजिक आहे. पण लोकशाहीचा प्रत्यक्ष आचार ज्यांना करावयाचा आहे त्यांनी अशा मनःस्थितीच्या कधींच आहारीं जातां कामा नये. नाहीं तर एका बाजूची स्वार्थी, हीन व संकुचित वृत्ति व दुसऱ्या बाजूचा अविवेक, संताप व माथेफिरूपणा यांची युति होऊन येथें वाटेल ती अनर्थपरंपरा कोसळेल. इतर देशांत हेंच झाले आहे. ते आपल्या या भूमींत न होऊं देण्याची जितकी काँग्रेसची जबाबदारी आहे तितकीच भारताच्या नागरिकांचीहि आहे. म्हणून विवेकानें विचार करण्यास त्यांनी सिद्ध झाले पाहिजे.