पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६६
भारतीय लोकसत्ता

(म्हैसूर २५-४-४९) मद्रास, बंगाल, संयुक्तप्रांत या राज्यांत सरदारजींनीं काँग्रेसच्या शुद्धीसाठी सारखे दौरे केले. लखनौहून परत जातांना त्यांनी पुढील प्रमाणे पत्रक काढले होतें. (१०-१-५०) 'तुमच्या प्रांतांतील चिरफळ्या व गटबाजी पाहून मला अत्यंत दुःख झाले. तुमच्यांतील मतभेद तात्त्विक स्वरूपाचे नसून स्वार्थविषयक आहेत व ते कॉंग्रेसला अत्यंत विघातक आहेत. प्रत्येक प्रांतांत अधःपाताची जणुं शर्यतच लागली आहे. तुम्ही हीन स्वार्थापायीं भांडत बसता व आपसांत गट निर्माण करता. काँग्रेस कार्यकारिणीने अनेक वेळां निषेध केला तरी ते तुम्ही मोडत नाहीं; यामुळे काँग्रेसचें नांव कलंकित होत आहे. व्यक्तिहितापेक्षां काँग्रेसचें हित श्रेष्ठ आहे हे ज्यांना मानवत नसेल त्यांनी काँग्रेसमधून चालते व्हावें.' बार्डोली, जोधपूर, मद्रास येथें याच शब्दांत सरदारजींनी काँग्रेस सदस्यांची निर्भत्सना केली आहे. 'बाहेरच्या आक्रमणाची भीति मला वाटत नाहीं. आपला नाश झाला तर तो अंतःकलहानेंच होईल. आतां जर आपण अपयशी ठरलों तर तो दोष सर्वस्वी आपला आहे. खरोखर या दुफळ्या पाहून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेच कसें, याचे मला आश्चर्य वाटते. (मद्रास २३-२-४९) 'गेल्या तीन वर्षांतले आपले वर्तन अत्यंत लज्जास्पद असें आहे. वैयक्तिक हेवेदावे, मत्सर व सत्तास्पर्धा अशीच चालू राहिली तर, गांधीजींनी जे अमृत प्राप्त करून दिले आहे त्याचें लवकरच विष होऊन जाईल.'
 १९४९ साली काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या यांनी काँग्रेसजनांच्या मार्गदर्शनासाठी पुढील सूचनापत्रक काढले होते. (१८-१-४९) 'काँग्रेसच्या प्रतिनिधींनी आयात-निर्यात दुकानांचे परवाने स्वतःसाठीं वा मित्रांसाठी घेऊ नयेत. न्यायप्रविष्ट खटल्यांत न्यायाधीशांना भीड घालू नये. असें अनेक वेळां झाल्याचें ऐकतों. ट्रॅन्सपोर्ट कमिटी, क्लॉथ लायसेन्स बोर्ड यावरच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपली संघटना अभेद्य होती; पण त्यानंतर पक्षांत उपपक्ष, त्यांत पुन्हां गट, अशा फळ्या झाल्या आहेत. एका गटाचा माणूस मंत्री झाला कीं दुसरा गट त्याच्याविरुद्ध फळी उभारतो. सिनेमाची जागा, दुकानची जागा, आयात निर्यात परवाने- एवढे