पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६५
राजकीय पुनर्घटना

प्रलयाकडे निघालेल्या या महायंत्राचा सारथी तरी सावध आहे, एवढी समाधानाची गोष्ट आहे यांत शंका नाहीं.
 २७ ऑगस्ट १९४९ रोजी कानपूर प्रांतिक काँग्रेसच्या बैठकीत भाषण करतांना पंडित जवाहरलालजींनी पुढीलप्रमाणे कडक टीका केली. 'गेली दोन वर्षे काँग्रेसचें कार्य ज्या पद्धतीने चालू आहे ती तिला फारशी भूषणावह नाहीं. ज्या संघटनेनें भारतांत राज्यक्रांति घडवून आणली ती संघटना हीच काय, असा या देशांतले व बाहेरचे लोक विस्मित होऊन प्रश्न विचारीत आहेत. आतां आपल्या सत्त्वपरीक्षेची खरी वेळ आहे. आपण सध्यां आपल्या पूर्वपुण्याईवर जगत आहों. पण असे किती दिवस चालणार? त्याग व सेवा हें आपले पूर्वीचे बळ होतें. ते व्रत आपण पुढे चालविले नाहीं तर लोक आपली जुनी पुण्याई विसरून आपणांस पाठमोरे होतील.' ३० जानेवारी १९५१ रोजी अहंमदाबादला अखिल भारतीय काँग्रेस- समितीपुढें त्यांनीं अगदीं तळमळून पुढीलप्रमाणे उद्गार काढले; 'आतां काँग्रेसचा आत्माच नष्ट होण्याची वेळ आली आहे. त्याच्या जपणुकीसाठी आपल्याला निकराचा झगडा केला पाहिजे. आपले सर्व लक्ष जडदेहाच्या कल्याणाकडे असून आत्म्याची आपणांस विस्मृति झाली आहे. काँग्रेस आंतून कुजूं लागली आहे. या संस्थेला कसली तरी दुर्धर व्याधि जडली आहे.' दिल्ली स्टेट कॉन्फरन्सपुढे बोलतांना (८-४-५१) तर ते फारच निराश झालेले दिसतात. 'आपण महात्माजींची शिकवणूक विसरलो असून क्षुद्र विषयावर भांडत बसलो आहों. आपल्या हातून कसलेंहि कार्य घडत नाहीं. या देशाचा इतिहासच असा आहे की, त्यानें प्रत्येक वेळी आपल्या विजयाचे पराभूतींत- विनाशांत रूपांतर केले आहे.'
 कैलासवासी सरदार वल्लभभाई पटेल यांचे उद्गार याहिपेक्षा जास्त स्पष्ट व जास्त कठोर आहेत. 'आज काँग्रेसजनांना प्रथम स्वार्थ दिसतो. आपण सर्वांनी त्याग करून आपले सामर्थ्य पूर्वी वाढविलें, पण आतां त्या त्यागाची भरपाई करावयाची संधि आली आहे, असे काँग्रेस-सदस्यांना वाटत असावेसे वाटते. आपली नैतिक पातळी अगदी खाली गेली असून भोवतालच्या हीन वातावरणाचा संसर्ग काँग्रेसलाहि बाधलेला दिसतो.'