पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६४
भारतीय लोकसत्ता

हेहि प्रकार झाले. आणि असें असूनहि याची जाहीर चवकशी झाली नाहीं. भारताच्या प्रत्येक प्रांतांत काँग्रेसची अशीच विघटना चालू आहे. या थोर संघटनेची अभंग, एकसंघ अशी फळी, मुंबई हा अपवाद वजा जातां, कोठेंच राहिलेली नाहीं. बिहारमध्ये श्रीकृष्णसिंह व अनुग्रहनारायणसिंह, पंजाबमध्ये साचार व भार्गव, मध्यभारतांत लीलाधर जोशी व विजयवर्गीय, राजस्थानांत हिरालाल शास्त्री व जयनारायण व्यास अशी द्वंद्वे व तदंतर्गत क्षुद्र कलह सर्वत्र चालू होते व आहेत. आणि अत्यंत खेदजनक गोष्ट ही की हे कलह तत्वासाठी नसून क्षुद्र स्वार्थासाठी आहेत.
 भारतवर्षांमध्ये अखिल राष्ट्रव्यापी जनमनावर वर्चस्व गाजविणारी आणि अखिल भूमीची चिंता वहाणारी अशी काँग्रेस ही एकच संघटना आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या सलामीतच तिचीं अशीं ही अनंत शकले झालेली पाहून या भूमीच्या भवितव्याविषयीं विचारवंतांना अतिशय निराशा वाटू लागते.

जागरूक सारथी

 पण या अंधाऱ्या निराशेत अजूनहि आशेचा एक किरण उजळतो आहे असें वाटतें, काँग्रेसचे जे अग्रश्रेणींतले नेते आहेत, त्यांना या विघटनेची पूर्णपणे जाणीव असून वेळोवेळी आपल्या अनुयायांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दांत निषेध केला आहे. अध्यक्ष राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल, राजर्षि तंडन, पट्टाभि सीतारामय्या यांचे या विघटनेला आळा घालण्याचे प्रयत्न अहर्निश चालू आहेत. प्रत्येक सभेत, बैठकीत खाजगी किंवा प्रगट रीतीने ते काँग्रेसच्या सभासदांना आपल्या संस्थेला जडलेल्या या रोगाची जाणीव देत आहेत. त्याची चिकित्सा करून आपले निदान त्यांना सुनावीत आहेत व अधोगामी वृत्तीला पायबंद बसला नाहीं तर आपला समूळ नाश झाल्यावांचून रहाणार नाहीं, असें त्यांना अगदीं निःसंदिग्ध शब्दांत बजावीत आहेत. अर्थात् आज चारपांच वर्षे ही कानउघाडणी चालू असूनहि तिचा कसलाहि परिणाम काँग्रेससदस्यांवर झालेला नाहीं हें उघड आहे. पण वेगानें