पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६३
राजकीय पुनर्घटना

व्हावी असा अर्ज दिला; पण त्यांनी आंतल्या आंत चवकशी करून, विशेष कांहीं घडलें नाहीं असा निर्णय दिला व तें प्रकरण मिटवून टाकले. त्यामुळे टी. प्रकाशम् हे काँग्रेसमधून फुटून निघाले व त्यांनीं 'डेमोक्रॅटिक फ्रंट' या नांवाचा स्वतंत्र पक्ष काढला. टी. प्रकाशम् व त्यांचा पक्ष यांनीं सत्ताधारी पक्षावर जे आरोप केले ते खरे कीं खोटे हा प्रश्न येथें गौण आहे. ते खोटे असतील तर त्यांच्या पक्षानें सत्तेच्या अभिलाषाने दुसऱ्या पक्षावर दुष्ट बुद्धीनें निंद्य आरोप केले असा त्याचा अर्थ होईल; पण काँग्रेसच्या एकाच पक्षांत फळ्या निर्माण झाल्या, काँग्रेसची विघटना होऊं लागली, हे सत्य बदलत नाहीं. एक फळी धनमोहाला बळी पडली, कीं दुसरी सत्तामोहाला बळी पडली, एवढाच काय तो प्रश्न. जागृतीनंतर संघटना अभंग राखण्याची विद्या आम्हांला वश नाहीं, हा निर्णय अटळच आहे.
 उत्तरप्रदेश, पंजाब, बंगाल या राज्यांची हीच कहाणी आहे. उत्तर-प्रदेशांतील पन्नास काँग्रेसजनांनी वरिष्ठ नेत्यांकडे अर्ज करून, जमीनदारी नष्ट करण्याच्या प्रकरणांत मंत्र्यांनी लाखों रुपये खाल्ले, असे आरोप केले. बंगालच्या मंत्रिमंडळाविरुद्ध तेथील काँग्रेसजनांनी असाच अर्ज करून एकंदर सतरा आरोप त्यावर केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या आरोपांची चवकशी करून, या सतरा आरोपांपैकी बारा आरोपांना मंत्रिमंडळाने समाधानकारक उत्तरे दिलीं, असें जाहीर केले. पण म्हणून काय झाले ? राहिलेल्या पांच आरोपांचे काय ? कापडाचा काळा बाजार केला म्हणून एका व्यापाऱ्यावर खटला झाला होता. बंगालच्या पंतप्रधानांनी मध्ये पडून तो काढून घेतला. एका कंपनीविरुद्ध ॲन्टीकरप्शन खात्यानेच पुरावा दिला होता. तोहि खटला सरकारने काढून घेतला. मिठाचे परवाने आपल्या सग्यासोयऱ्यांना दिले. वेस्ट बेंगॉल प्रॉव्हिन्शियल कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल प्रोक्युअरमेंट ॲन्ड डिस्ट्रिब्यूशन सोसायटी- या संस्थेच्या कारभारांत द्रव्यापहार व अव्यवस्था आहे असे आढळूनहि तिच्यावर खटला केला नाहीं. राहिलेले पांच आरोप आहेत ते असले आहेत. आणि त्यासाठी विरुद्ध पक्षानें दिलेला पुरावा मोठा विक्षोभक आहे, असें पंडितजींनींच म्हटले आहे. या प्रकरणी नेहमीप्रमाणेच अवश्य त्या फायली हरवणें, नष्ट होणें, पळवून नेणे