पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६२
भारतीय लोकसत्ता


विघटना

 राजकीय पुनर्घटनेचा उत्तर भाग जो लोकसंघटना, त्याबाबतीत काँग्रेस अपयशी ठरणार आणि जगांतल्या इतर लोकसत्ता ज्या मार्गाने गेल्या त्याच मार्गाने भारताची लोकसत्ताहि जाणार, अशी एक अत्यंत दारुण भीति सध्यां मनाला ग्रस्त करीत आहे. काँग्रेसचे नेते इतके चारित्र्यभ्रष्ट होतील व स्वार्थ, धनमोह, वैयक्तिक हेवेदावे, सत्ताभिलाष असल्या कारणामुळे प्रांतोप्रांत या संघटनेंत तट पडतील, भारताच्या स्वातंत्र्यार्थ पन्नास वर्षे संग्राम करणाऱ्या या संस्थेच्या या कारणांमुळे चिरफळ्या होतील, हे कोणाच्या स्वप्नांतहि आले नसेल; पण हें सत्य डोळ्यांसमोर घडत आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्याखेरीज गत्यंतर नाहीं.
 काँग्रेसच्या या विघटनेला मद्रास प्रांतांत प्रथम सुरवात झाली. टी. प्रकाशम् हे आन्ध्र प्रांतांतील कॉंग्रेसचे नेते असून १९४७ मध्ये प्रथम मद्रासचे पंतप्रधान होते. पुढें पदच्युत झाल्यानंतर त्यांनी नवीन आलेल्या मंत्रीमंडळावर जे आरोप केले ते इतके भयंकर आहेत कीं कोणाहि भारतीयाला ते वाचून धक्काच बसावा. त्यांच्या मते, अमुक एक पाप या नव्या मंत्रिमंडळाने करावयाचें ठेवले होते असे नाहीं. धान्यवाटपाचे काम एका सहकारी संस्थेकडे द्यावयाचें ठरले होते. ते तसे न देतां मंत्रिमंडळाने आपल्या ओळखीच्या व्यापाऱ्यांकडे दिले. न्यायालयांत चाललेले पुष्कळ खटले काढून घेण्याचे हुकूम दिले. मद्रास हायकोर्टाच्या कामांत हस्तक्षेप करून मुख्य न्यायाधीशांचा अवमान केला. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. सीमेंट, सूत, पोलाद यांच्या आयात निर्यातीचे परवाने आपल्या सग्या-सोयऱ्यांना दिले. मद्रासचे अर्थमंत्री ज्या सुदर्शन कंपनीचे डायरेक्टर होते त्या कंपनीला दहा लाखाचे कर्ज दिले. मंत्री झाल्यावर अर्थमंत्र्यांनी त्या कंपनीचे आपले शेअर बायकोच्या नांवाने बदलून घेतले; पण विशेष असे कीं त्या कंपनीचा धंदा अजूनहि सुरू झालेला नाही. दुसऱ्या एका मंत्र्यानें बंगोलरच्या एका कंपनीला डिझेल बसेस घेण्यासाठी १२ लाख रु. कर्ज म्हणून दिले. अशी कंपनी अस्तित्वांतच नव्हती व नाहीं. टी. प्रकाशम् यांनीं काँग्रेसच्या नियंत्यांकडे सर्व गोष्टी कळवून रीतसर चवकशी