पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६१
राजकीय पुनर्घटना

"परकीय दास्यांतून मुक्त होण्याच्या प्रचंड घोषणा करीत असतांना अमेरिकन लोक एका दुसऱ्या दास्याच्या आहारी जात होते. दुही, फूट, विघटना यांचें तें दास्य होते. या दास्यांतून अराजक व दौर्बल्य निर्माण होऊन समाजाचा नाश होतो.'
 इतिहासाची पुनरावृत्ति होते असे म्हणतात. मानवी स्वभाव सर्वत्र सारखा असतो, त्याच लोभमोहाला तो सर्वत्र बळी पडतो, तेच रागद्वेष त्याच्यावर सर्वत्र वर्चस्व गाजवितात, तीच मनाची क्षुद्रता, तोच अविवेक, तीच विपरीत बुद्धि यांच्या आहारीं तो जातो आणि भिन्न भिन्न काळी व स्थळीं तोच इतिहास निर्माण करतो. भारतांत कोठल्या इतिहासाची पुनरावृत्ति होणार, असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर आपल्याला शोधावयाचे आहे.
 महात्माजी गेल्याबरोबर काँग्रेसनें आपलें विशाल राष्ट्रव्यापी रूप टाकून दिले. काँग्रेसच्या कक्षेत यापुढें भिन्न मतांच्या लोकांना जागा नाहीं असा तिच्या सूत्रधारांनीं दण्डक घालून टाकिला. टिळक व महात्माजी यांचें धोरण नेमके याच्या उलट होतें हें आपण पाहिलेच आहे. समाजवादी पक्षानें काँग्रेसमध्येच स्वतंत्र गट केला असूनहि महात्माजींनी त्याला काँग्रेसमध्ये राहवून घेतले; इतकेच नव्हे, तर जयप्रकाश नारायण किंवा आचार्य नरेंद्र देव यांपैकी कोणाला तरी काँग्रेसचे अध्यक्षपद द्यावे असे सुचविले होते; पण महात्माजींच्या मागून जे काँग्रेसचे सूत्रधार झाले त्यांना हें व्यापक धोरण मानवले नाहीं. त्यांनीं भिन्नमतवादी लोकांना काँग्रेसमध्ये रहाणे अशक्य करून टाकिलें आणि त्यामुळे अखिल भारतव्यापक अशी एकही संघटना या देशांत राहिली नाहीं. विघटनेला येथून प्रारंभ झाला. पण एवढेंच होऊन काँग्रेसची विघटना थांबली असती तर ती फार मोठी आपत्ति ठरली नसती; पण काँग्रेसचें सत्त्व आतां लोपत चाललें होते. सत्तारूढ झाल्याबरोबर काँग्रेसच्या नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या स्वार्थी वासना व अधोगामी वृत्ति अत्यंत प्रबळ झाल्या आणि पूर्वसूरींनीं रक्ताचें खतपाणी घालून जोपासलेल्या या संघटनेला प्रत्येक प्रांतांत तडे जाऊं लागले. आणि आज या प्राचीन सनातन भूमीच्या सर्वनाशाचें भयानक दृश्य विचारवंतांच्या डोळ्यांपुढे उभे राहूं लागले आहे.