पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६०
भारतीय लोकसत्ता

शासनाचें हे महत्त्व जाणून लोकजागृतीबरोबरच लोकसंघटना निर्माण करून ती दृढ व अभंग राखण्याचे धोरण ठेविले होतें. त्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास ते महापुरुष सदैव सिद्ध असत. काँग्रेससंघटना अभंग रहात असेल तर, सुरतेचें अपयश, कारण नसतांहि, स्वतःच्या शिरी घेण्याचे टिळकांनी मान्य केले होते, हे मागे सांगितलेच आहे. पुढेहि अनेक वेळां काँग्रेसनिष्ठा व स्वतःच मते यांत संघर्ष आला तेव्हां त्यांनीं स्वमताचा आग्रह बाजूस ठेवून काँग्रेसनिष्ठेला वंदन केले. महात्माजीचेंहि हेच धोरण होतें. स्वराज्यपक्षाची मते त्याना मान्य नव्हतीं. तरी, त्याने फुटून जाऊ नये म्हणून, आपला आग्रह सोडून त्यांनी त्या पक्षाला काँग्रेसमध्ये जागा करून दिली. पुढें समाजवादी पक्षाबद्दलहि त्यांनी हेंच धोरण ठेवले होते. आणि अशा रीतीने काँग्रेसचीं शकले न होऊं देण्याविषयीं या दोन महापुरुषांनी अखंड दक्षता बाळागली होती. त्यांच्यानंतर पंडित जवाहरलाल यांनी काँग्रेस सरकारची घडण करतांना देशांतील सर्व पक्षांना एकसूत्रांत गोवण्याचा फार मोठा प्रयत्न केला. डॉ. आंबेडकर, श्यामाप्रसाद मुकर्जी हे काँग्रेसचे अगदीं कट्टे वैरी. पण मंत्रिमंडळांत त्यांना जागा देऊन देशाची संघटना अभंग राखण्यासाठी पंडितजींनी अत्यंत संयम करून ते जुनें वैर दृष्टीआड केलें, आणि भारतीय जनतेची एक अभंग फळी निर्माण केली. टिळक, गांधीजी व पंडितजी हे थोर नेते राष्ट्राची संघटना अभंग राखण्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास सिद्ध असत. याचे कारण एकच दिसते. लोकसंघटना भंगली तर सर्वनाश आहे हे त्यांनी जाणले होते. संघटनेस अवश्य ते गुण आपण जोपासले नाहींत तर व्यक्तिस्वातंत्र्याला, राष्ट्रीय स्वातंत्र्याला- कशालाच अर्थ नाहीं हे जगाच्या इतिहासांत त्यांना पदोपदी दिसत होते. अमेरिकेसारख्या एका प्रबल लोकसत्ताकाचा जनक वॉशिंग्टन यानें अगदी प्रारंभी आपल्या राष्ट्राला हेंच महातत्त्व शिकविले होते. 'लोक स्वतंत्र झाले असे केव्हां म्हणावे ? समाजकल्याणासाठी आपल्या वैयक्तिक स्वार्थांना व हक्कांना आपण होऊन मुरड घालण्याची सद्बुद्धि ते दाखवितील तेव्हां. तोपर्यंत त्यांना स्वतंत्र म्हणतांच येत नाहीं.' असे वॉशिंग्टन नित्य सांगत असे. मागें उल्लेखिलेले अमेरिकन वरिष्ठ न्यायालयाचे पहिले न्यायाधीश मार्शल यांचेहि याविषयींचे उद्गार प्रसिद्ध आहेत.