पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५९
राजकीय पुनर्घटना

जागृत होतांच त्या समाजाच्या चिरफळ्या होऊं लागल्या. त्यावेळी त्यांतील कांहीं पराक्रमी पुरुषांनी दंडसत्तेचा आश्रय करून आपले साम्राज्य स्थापन केलें, रोमन साम्राज्याचा विस्तार झाला, त्याचें वैभव वाढीस लागलें, ह्याचें श्रेय लोकायत्त समाजाच्या सामर्थ्याला नसून सामर्थ्यसंपन्न पुरुषांनी निर्माण केलेल्या दंडायत्त संघटनेला आहे. लोकशाहीची तत्त्वें रोमन समाजांत पसरतांच तेथें इतके कलह माजूं लागले कीं, तेथील समाजधुरीणांनीं साम्राज्यस्थापनेचें धोरण स्वीकारले नसते तर, ग्रीकाप्रमाणेच रोमचाहि नाश झाला असता. ग्रीक व रोमन हे समाज लयास गेल्यानंतर अनेक शतकें व्यक्तित्वजागृतीचा हा कठिण प्रयोग कोणींच केला नाहीं. तो पुन्हां सतराव्या शतकांत ब्रिटननें सुरू केला. आणि जागृतिगरोबरच संघटनेसाठी अवश्य असणाऱ्या गुणांचीहि त्या राष्ट्राने जोपासना करण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे त्याचा प्रयोग यशस्वी होऊन त्याच्या ठाय कल्पनातीत सामर्थ्य निर्माण झालें व कांहीं काळ सर्व जगाचे नेतृत्व त्याला करतां आले. ब्रिटनच्या मागून त्याच राष्ट्राची शाखा असलेल्या अमेरिकेने हा प्रयोग यशस्वी करून दाखविला. पण दोघांचा मिळून प्रयोग एकच. म्हणजे जागृत व्यक्तित्वाची संघटना करून त्यांतून सामर्थ्य निर्माण करण्यांत जगाच्या इतिहासांत आतांपर्यंत एकाच- फक्त एकाच समाजाला- अँग्लो-सॅक्सन समाजाला यश आलेले आहे. त्यानंतर युरोप व लॅटिन अमेरिका येथील अनेक देश, रशिया, चीन हे देश, यांतील जवळ जवळ प्रत्येकानें हा प्रयोग करून पाहिला; पण स्वित्झरलँड, स्कॉंडिनेव्हियन देश यासारखे लहान अपवाद सोडले तर त्यांत कोणालाहि यश आलें नाहीं. व्यक्तित्वजागृति म्हणजे चिरफळ्या, भेद, शकले हाच सिद्धांत प्रत्येकानें सिद्ध करून दाखविला. शेवटी त्यांतील कांहींनीं दंण्डसत्तेचा आश्रय करून आपल्या संघटना अभंग राखिल्या व तेहि ज्यांना जमलें नाहीं ते देश दुबळे बनून परक्यांच्या आहारी गेले, व स्वातंत्र्यही गमावून बसले.
 तेव्हां व्यक्तित्वजागृति हे एक फार कठिण व्रत आहे. जागृत व्यक्तित्व संघटित ठेवण्याची विद्या जर समाजानें प्रथमपासूनच अभ्यासिली नाहीं तर तो समाज दुबळा होऊन त्याचा सर्वनाश होण्याचा संभव असतो. स्वातंत्र्यपूर्व काळांत लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांनी लोकायत्त