पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५८
भारतीय लोकसत्ता

लोकसत्तेचा आत्मा होय. तिच्या अभावीं कोणचीहि लोकसत्ता यशस्वी होणे शक्य नाहीं. लोकजागृति व लोकसंघटना यांतील पहिल्या अंगाची जोपासना काँग्रेसने समाधानकारकपणे केली आहे हे आपण येथवर पाहिले. आतां जागृत व्यक्तित्व संघटित करण्याच्या दृष्टीनें काँग्रेसच्या यशाचे मापन करावयाचे आहे.
 लोकमत जागृत करणे हे एकपट अवघड असले तर ते संघटित करून त्यांतून 'शक्ति' निर्माण करणे हे शतपट अवघड आहे. कृषिखात्यांतील एक जुने अधिकारी नेहमी म्हणत की, 'जेथे पूर्वी धान्याचें एक कणिस निर्माण होत होते तेथे आपल्या कष्टानें दोन कणसे निर्माण करणारा शेतकरी हा जगाचा उपकारकर्ता आहे.' आपल्यापरी हे वचन खरेंच आहे. पण त्याहिपेक्षां जास्त खरें असे एक वचन आहे. जेथें पूर्वी एक एक अशी फुटीरपणे माणसें कार्य करीत होतीं त्या ठायीं, दंडसत्तेचा आश्रय न करतां, दोन व्यक्तित्वजागृत माणसांना सहकार्याने एकत्र काम करण्यास उद्युक्त करणारा माणूस हा जगाचा सर्वांत मोठा उपकारकर्ता होय. व्यक्तित्व जागृत होतांच मानवांच्या सर्व गुणांचा विकास होऊं लागतो हे खरे. तत्त्वज्ञान, कला, साहित्य, धर्म इ. क्षेत्रांत मानवाची व्यक्तिस्वातंत्र्यामुळे अत्यंत वेगानें प्रगति होऊं लागते. पण या लोकजागृतीबरोबरच लोकसंघटनेची विद्या हस्तगत करता आली नाहीं, तर समाज भेदजर्जर होतो, छिन्नभिन्न होतो, त्याची अनंत शकले होतात, आणि सर्व सांस्कृतिक मंदिराचा पाया म्हणजे जे आत्मरक्षणाचे सामर्थ्य तेच त्याला निर्माण करता येत नाहीं. आणि मग सांस्कृतिक दृष्टीने प्रगत पण भेदामुळे दुर्बल झालेल्या या समाजावर कमी संस्कृत संघटित समाज आक्रमण करून त्याचा नाश करतात. मग त्याचे स्वातंत्र्य व त्याची संस्कृति यांच्यासह त्याच्या व्यक्तित्वधनाचाहि नाश होतो. ग्रीसचा इतिहास याचीच साक्ष देत आहे. तेथें बुद्धिनिष्ठा, विचारस्वातंत्र्य हीं जागृत होतांच विद्याकलांची पुष्कळ प्रगति झाली. आणि जेव्हां जेव्हां या जागृत व प्रगतिमान् समाजांत संघटना निर्माण होई, तेव्हां तेव्हां आपल्यापेक्षां दसपटीने मोठ्या आक्रमकासहि तो धूळ चारीत असे, पण हे फार काळ टिकले नाहीं. आणि लवकरच शतधा भिन्न होऊन हा समाज लयास गेला. रोमचा प्रारंभींचा इतिहास असाच आहे. व्यक्तित्व