पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४
भारतीय लोकसत्ता

इतिहासांत उदाहरणे सांपडतात. अनेक ब्राह्मणांनी व क्षत्रियांनी हिंदुधर्माची कक्षा सोडून देऊन इतर धर्मपंथ काढले व त्यांना ब्राह्मणक्षत्रियांतून अनुयायीहि मिळाले, हे त्याचेच द्योतक आहे. पण असे होते तरी या वरिष्ठ वर्गातल्या कोणच्याहि व्यक्तीने वा गटानें राजसत्ता किंवा धर्मसत्ता यांच्याविरुद्ध तत्त्वज्ञान सांगून लढा पुकारल्याचे इतिहास सांगत नाहीं. आणि ही राजकीय प्रबुद्धता व तज्जन्य लढा हे जोपर्यंत दिसत नाहीं, तोपर्यंत केवळ बाह्यरूपावरून एखाद्या शासनाला लोकायत्त शासन म्हणणे व त्या राज्य- पद्धतीला प्रजासत्ताक म्हणणे याला मुळींच अर्थ नाहीं.

ग्रामपंचायतींचे निरीक्षण

 हिंदुस्थानांतील ग्रामपंचायतींचे असेच आहे. या ग्रामपंचायती म्हणजे स्थानिक स्वराज्यच होत, ही लोकसत्तेचीं बीर्जे होत, असा या ग्रामसंस्थांचा गौरव करण्यांत येतो. भारतांतील गणराज्य हीं इ. स. पू. ६०० ते इ. स. ४०० या हजार वर्षाच्या काळांतच उत्कर्ष पावली; पण लोकायत ग्रामसंस्था या वेदकाळापासून पेशवाई अखेरपर्यंत जशाच्या तशा टिकून होत्या असे इतिहासवेत्ते सांगतात. अशा तऱ्हेच्या ग्रामसंस्था निर्माण होणें व एवढ्या दीर्घ कालपर्यंत टिकून रहाणे यांत जो कांहीं थोडा गौरवाचा भाग आहे तो अमान्य करावा असा माझा मुळींच हेतु नाहीं. अगदी एकतंत्री सत्तेपेक्षा अशा तऱ्हेचा समाईक कारभार हा केव्हांहि जास्त चांगला असतो यांत वाद नाहीं. गांवची करवसुली, गांवचे न्यायदान, गांवांतील मंदिरें, तलाव, जंगले यांची व्यवस्था आणि गांवचा एकंदर योगक्षेम केन्द सत्तेनें नेमलेल्या एखाद्या अधिकाऱ्याने पहाण्यापेक्षां गांवच्या लोकांनींच एकत्र येऊन, सभा भरवून, स्वतःच्या जबाबदारीनें पहाणे हे केव्हांहि जास्त श्रेयस्कर होय; पण याला लोकसत्ता म्हणणे, भारताच्या लोकशाहीचीं हीं मूळरूपें आहेत असा अभिमान वहाणे आणि भारतीय मनोवृत्तीत लोकशाहीचीं बीजें दिसत नाहींत या पाश्चात्यांच्या आक्षेपाला आमच्या ग्रामपंचायती हे उत्तर आहे, असे विधान करणे म्हणजे लोकसत्ता या थोर कल्पनेची विटंबना करण्यासारखे आहे. कारण लोकसत्ता ही मानवाच्या पृथगात्मतेतून, त्याच्या वैयक्तिक अहंकाराच्या प्रबल अशा स्फुरणांतून,