पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५७
राजकीय पुनर्घटना

म्हणतां येणार नाहीं. १७ कोटी मतदार ज्यांत आहेत अशा समाजाच्या लोकशाहीचा हा पहिला प्रयोग होता. अशा प्रचंड प्रमाणावर जगांत आजपर्यंत लोकशाहीचा प्रयोग कोठेंहि व केव्हांहि झालेला नाहीं. अशा या प्रयोगाकडे सर्व जगाचें लक्ष लागले होते. पुढील सत्तेच्या दृष्टीने काँग्रेसच्या यशापयशाचा विचार आपणांस पुढे करावयाचा आहेच. पण निवडणुकांचा व्यवहार काँग्रेसने अत्यंत दक्षतेनें, कार्यक्षमतेने व निर्मळपणे घडविला, या तिच्या परम उज्ज्वल व विलोभनीय यशाचा वांटा तिच्या पदरांत टाकल्यावांचून आपणांस पुढे जातां येणार नाहीं. राजकीय समतेच्या व व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रगतीच्या दृष्टीने काँग्रेसने केलेले हे तिसरे महत्कृत्य आहे. सहा कोटी संस्थानी प्रजा, सहा कोटी अस्पृश्य व जवळ जवळ चारपांच कोटी गुन्हेगार व आदिवासी, अशा सोळासतरा कोटीच्या मानवसमूहाला मानवतेचे मूलभूत हक्क देणे, अशा लोकांनीच जो समाज बहुतांशी घडला आहे त्याला पूर्ण लोकायत्त अशी घटना सिद्ध करून देणे आणि सत्ता हाती असूनहि, आपली पदच्युति डोळयाला दिसत असूनहि निवडणुकांत कोणत्याहि वाममार्गाचा अवलंब न करतां, कोठेंहि हस्तक्षेप न करतां, पूर्ण समभूमीवरून हा सामना घडविण्याची कोशीस करणे ही काँग्रेसची त्रिविध लोकसेवा भारताच्या भावी इतिहासकाराला अभिमानानें व कृतज्ञतेने नमूद करावी लागेल. काँग्रेसला तिचे हे श्रेय अर्पण करून राजकीय पुनर्घटनेच्या उत्तरभागाचे विवेचन आपण हाती घेऊं.

लोकसंघटना

 कोणच्याहि समाजाच्या राजकीय पुनर्घटनेची दोन अंगे असतात. प्रत्येक मनुष्याच्या ठायींचें व्यक्तित्व जागृत करणे हे पहिले अंग, आणि अशा या जागृत समाजाची संघटना करून सामर्थ्य निर्माण करणे हे दुसरे अंग होय. कोणच्याहि जुलमी, अन्यायी, मदांध अशा परकीय वा स्वकीय सत्तेचा प्रतिकार करून शेवटी तिला पदच्युत करणारी जी 'लोकशक्ति' ती, ही दोन्ही अंगे परिपुष्ट झाली, तरच निर्माण होते. ही लोकशक्ति हा
 भा. लो.... १७