पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५६
भारतीय लोकसत्ता

निर्माण करण्याचे ब्रीद निष्ठेने चालविले आहे याविषयी फारसे दुमत होणार नाहीं.

निवडणुकीतील निर्मळ भूमिका

 पण काँग्रेसची वृत्ति काय आहे याची खरी कसोटी भारतांतील पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकींच्या वेळी लागली. घटनेनें दिलेले भाषण- मुद्रण- संघटन स्वातंत्र्य सरकार या प्रसंगी जनतेला किती लाभूं देते व ज्या निवडणुकीत स्वतःवर सत्ताच्युत होण्याचा संभव आहे त्या सरळ मार्गाने होऊ देते की नाही यावरून त्याची लोकशाही तत्त्वावरची निष्ठा परीक्षितां येते; आणि या निकषावर घांसली असतां काँग्रेसची निष्ठा बावन्नकशी ठरली आहे हे तिच्या शत्रूंनींहि मान्य केले आहे.
 निवडणुकीच्या दोनचार महिन्यांत केन्द्रीय व प्रांतिक सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेचा नुसता भडिमार चालविला होता. सूक्तासूक्त सर्व आरोप त्यांच्यावर केले, वाटेल तीं भाषणे केलीं. तरी हाती असलेल्या कायद्यांचा या टीका बंद पाडण्यासाठीं चुकूनसुद्धां सरकारने उपयोग केला नाहीं. इतकेंच नव्हे तर, कारावासांत असलेल्या कम्युनिस्टांना मुक्त करून खुला सामना भरविण्यास मुभा दिली व आपल्या हातानें आपल्या पराभवाची वाट मोकळी करून दिली. मुद्रण- स्वातंत्र्याप्रमाणेच जनतेच्या संघटन - स्वातंत्र्यावरहि काँग्रेसनें कोठें गदा आणली नाहीं. वाटेल तशी पक्षसंघटना करण्यास सर्वांना सर्वत्र अवसर दिला होता. जवळजवळ एकशेवीस पक्ष निवडणुका लढवीत होते, यावरूनच ही गोष्ट स्पष्ट होईल. प्रत्यक्ष निवडणुकांच्या व्यवहारांतहि सरकारने आपली भूमिका बव्हंशी निर्मळ राखली आहे. कांहीं अपप्रकार झाले; नाहीं असे नाहीं. पण सर्व व्यवहार शेवटीं मानवाच्या हातूनच व्हावयाचे असतात आणि मानव हा अपूर्ण प्राणी आहे हे लक्षांत घेतां, काँग्रेसच्या लोकशाहीवरील निष्ठेला उणीव आली असे म्हणण्याजोगे तिच्या हातून कांहीं घडले आहे, असे म्हणतां येणार नाहीं. मद्रास, त्रावणकोर, कोचीन, राजस्थान, पेप्सू, ओरीसा या राज्यांत काँग्रेसने पराभव स्वीकारलेला आहे, आणि इतर प्रांतांत मुरारजीसारखे मोहरे पराभूत झालेले आहेत. यावरून सरकारनें या कामांत कोठें इस्तक्षेप केला आहे असे त्याच्या शत्रूलाहि