पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५२
भारतीय लोकसत्ता

होतें. रशिया, इटली, जर्मनी, पोलंड या देशांत गेल्या शतकांत लढे झाले पण ते राष्ट्रीय स्वातंत्र्याचे लढे होते; व्यक्तिस्वातंत्र्याचे नव्हते. म्हणूनच त्या देशांत लोकसामर्थ्याचा विकास झाला नाही. आणि स्वातंत्र्यानंतर तेथे सर्वत्र दंडसत्ता प्रस्थापित झाली. भरतभूमीनें प्रारंभापासूनच राष्ट्रस्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य- म्हणजेच राजकीय समता- यांत अभेद मानून, व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्व सामर्थ्याचे उगमस्थान आहे हे जाणून, चळवळीस प्रारंभ केला. प्रथमपासूनच व्यक्तीच्या राजकीय स्वातंत्र्याची काँग्रेसने ही जोपासना केली यासाठी भरतभूमि तिची सदैव ऋणी राहील. १८८१ सालापासून येथे लोकशक्ति निर्माण करण्याचें जे ध्येय लो. टिळकांनी डोळ्यापुढे ठेवले होतें, ते यामुळे सफल झाले. आणि या भूमीला लोकसत्तेचा प्रयोग यशस्वी होण्याची जो थोडीफार आशा वाटते ती यामुळेच स्वातन्त्र्यपूर्वकाळच्या पुण्याईचा हिशेब असा आहे.
 अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट अशी की, स्वातन्त्र्यानंतरच्या काळांतहि सत्ताधिष्ठित काँग्रेस सरकारने भारतांतील नागरिकांच्या ठायीं व्यक्तिमत्वाची जागृति करून राजकीय समतेची प्रस्थापना करण्याचे धोरणच पुढे चालविले आहे. यासाठी काँग्रेसला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.

सरंजामी सत्तेचा नाश.

 स्वातंत्र्यप्राप्ति होतांच राजकीय प्रबुद्धतेच्या प्रगतीच्या दृष्टीने काँग्रेसनें जे पहिले महत्कृत्य केले ते म्हणजे भारतांतील संस्थानांचे विसर्जन हे होय. ब्रिटिश अंमलाखालंची प्रजा स्वातंत्र्यापूर्वीच 'नागरिक' या सन्माननीय पदवीस जाऊन पोचली होती. व्यक्तित्वाचा तेजस्वी अहंकार तिच्या ठायीं आधींच पुष्ट झाला होता; पण संस्थानांत त्या वेळी सर्वत्र अंधार होता. तेथें मध्ययुगांतील कमालीची बेजबाबदार, अनियंत्रित व उन्मत्त अशीच सत्ता चालू राहिली होती. आणि त्यामुळे संस्थानांतील मानव हा लाचार, तेजोहीन व मनःसामर्थ्यहीन असा राहिला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनीं त्या मध्ययुगीन सरंजामी सत्तेचा नाश करून मानवतेपासून ढळलेली भारताची एकतृतीयांश प्रजा पुन्हां 'मानव' या महत्पदास आणून पोचविली. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारउच्चारस्वातंत्र्य, विरोधस्वातंत्र्य, या मनुष्याच्या