पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५३
राजकीय पुनर्घटना

जन्मसिद्ध हक्कांचा त्यांनी एवढ्या प्रचंड समाजाला लाभ करून दिला. गेल्या शंभरसवाशे वर्षांत ब्रिटिश अमलाखाली असलेल्या प्रांतांतून राममोहन, म. फुले, रानडे, विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, विवेकानंद, लजपतराय, मोतीलाल, जवाहरलाल, सुभाषचंद्र, पटेल बंधु, महात्मा गांधी, जगदीश चंद्र, चंद्रशेखर रमण यासारख्या थोर पुरुषांची प्रचंड परंपरा निर्माण झाली. पण त्याच अवधीत संस्थानी अमलाखालच्या पांचसहा कोटी प्रजेंतून या परंपरेंत शोभण्याजोगा एकहि पुरुष निर्माण झाला नाहीं. यावरून ही प्रजा राजकीय स्वातंत्र्याच्या अभावीं कशी सडत चालली होती हे दिसून येईल. आणि त्यावरूनच संस्थानी सत्तेचा नाश करून एवढ्या मोठ्या प्रजेला काँग्रेसने राजकीय समतेचा लाभ करून दिला ही तिची सेवा केवढी मोठी आहे याचीहि कल्पना येईल.

दलित जनतेचें मानवत्व

 संस्थानी प्रजेप्रमाणेच मानवतेच्या पदवीपासून च्युत झालेल्या अशा तीन जमाती हिंदुस्थानांत होत्या. अस्पृश्य जाति, गुन्हेगार जाति व आदिवासी जन, या त्या तीन जमाती होत. काँग्रेसनें कसलाही भेदाभेद न ठेवतां या कोट्यवधि मानवांना मानवतेचे मूलभूत हक्क देऊन टाकले. अस्पृश्यांची कहाणी सर्वांना ठाऊकच आहे. तिचा विस्तार करण्याचे कारण नाहीं. गुन्हेगार जमाती ही खास ब्रिटिशांची निर्मिति होती. मांग, रामोशी, कंजर या कांही ब्रिटिशांच्या पूर्वी गुन्हेगार ठरलेल्या जाति नव्हत्या. त्यांतल्या कांहीं जाति तर लढाऊ जाति होत्या. बेकार झाल्यामुळे त्या चोऱ्यामाऱ्या करूं लागल्या आणि राज्यकारभार सुलभ व्हावा म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्यावर गुन्हेगार असा कायमचा शिक्का मारून त्यांच्यांतील बहुसंख्य लोकांना गुन्हेगार वसाहतींत डांबून टाकलें, हा घोर अन्याय काँग्रेसवें तत्काळ दूर करून या भूमीवरचा एक फार मोठा कलंक धुवून काढला. आदिवासींचे नागरिकत्व हा तर अभूतपूर्व असा एक प्रयोग आहे. वेदकालापासून गिरिकन्दरांत रहाणारे लोक आतां प्रथमच भारताचे नागरिक होत आहेत. त्यांची संख्या जवळ जवळ तीन कोटी आहे. असुर या नांवाचीच एक चारपांच हजारांची जमात त्यांत आहे. नाग, संताळ, गोंड