पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५०
भारतीय लोकसत्ता

जीवनाचीं सर्व अंगोपांगें तपासून पाहिल्यावांचून लोकसत्तेचें यशापयश अजमावितां येणार नाहीं किंवा पुढील काळांतील निश्चित आंखणीहि करतां येणार नाहीं. म्हणून त्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षणास आतां प्रारंभ करूं.



प्रकरण नववें


राजकीय पुनर्घटना


लोकजागृति व लोकसंघटना

 या भूमीला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर येथील लोकसत्ता सुदृढं करण्यासाठीं भारतीय जीवनाची सर्वागीण पुनर्घटना करण्याचे काँग्रेसने व जनतेनें जे प्रयत्न चालविले आहेत, त्यांच्या यशापयशाचे मूल्यमापन आपण करीत आहोत. लोकशाहीच्या विकासासाठी राजकीय, आर्थिक, सामाजिक इ. सर्व अंगांची पुनर्घटना होणे म्हणजे एका परीने या सनातन भूमीचा पुनर्जन्मच होणें अवश्य आहे. या सर्व अंगांना आपापल्या दृष्टीनें महत्त्व असले तरी त्या सर्वांत राजकीय पुनर्घटना ही अधिक महत्त्वाची आहे, याबद्दल फार दुमत होणार नाहीं. आर्थिक समतेवांचून राजकीय क्षेत्रांतील समतेला वा स्वातंत्र्याला फारसा अर्थ नाहीं हें कितीहि खरे असले तरी, राजकीय क्षेत्रांतील जनतेची प्रबुद्धता, त्या क्षेत्रांतील समता व स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे, हा विचार आपण कधीहि दृष्टिआड होऊं देतां कामा नये. मार्क्सवादाच्या व सोव्हिएट रशियाच्या प्रचारामुळे आज लोकशाहीसंबंधीं अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होत आहेत. राजकीय स्वातंत्र्याचा बळी देऊनहि आर्थिक समता प्रस्थापित करावी, असे रशियाचे धोरण आहे आणि हीच खरी लोकसत्ता होय, अशी अत्यंत विपरीत कल्पनाहि प्रसृत करून रशिया धूळफेंक करूं पहात आहे. या सर्व गोंधळांत एक विचार आपण दृढपणें पकडून ठेवला पाहिजे. तो हा की, राजकीय स्वातंत्र्यांतूनच इतर स्वातंत्र्यें व समता निर्माण होत असतात व त्याच्या