पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४९
पुनर्घटना

भेदकारण आहे. मागासलेल्या व रानटी जाति यांची पराकाष्ठेची सांस्कृतिक हीनता हें तिसरें कारण आहे. सवर्ण हिंदुसमाजांतहि, ब्राह्मण- ब्राह्मणेतर कायस्थकायस्थेतर, उच्चवर्णीयहीनवर्णीय असे अनेक भेद आहेत. यापैकी एक वा अनेक कारणांनी दूर असलेल्या व्यक्ति आतां थोडेंस तरी अंतर कापून परस्परांच्या जवळ आल्या काय, असा लोकशाहीचा प्रश्न आहे. धर्म, जन्म व संस्कृति यांनी भिन्न असलेले समानघटक, आपण सर्व भारताचे नागरिक आहो या उच्च भूमिकेवर येऊन, परस्परांच्या जवळ यावे यासाठी काँग्रेसने या चार वर्षांत कोणते प्रयत्न केले व त्यांना कितपत यश आलॆ, हा सामाजिक पुनर्घटनेच्या दृष्टीनें मुख्य प्रश्न आहे.
 सर्वांत महत्त्वाचा प्रश्न मानवाच्या पुनर्घटनेचा आहे. व्यक्ति या दृष्टीने मनुष्य कितपत उन्नत झाला आहे, त्याग, सार्वजनिक हितबुद्धि, ध्येयनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव, कार्यक्षमता, प्रजासत्ताकाची सर्व प्रकारची जबाबदारी अंगावर घेण्याइतकी गुणसंपन्नता- म्हणजेच योजकता, दूरदृष्टि, सहकार्यवृत्ति, व्यापक आकलन, कार्यकुशलता, दक्षता, तळमळ इ. गुणांची परिपुष्टि, त्याच्या ठायीं कितपत झाली आहे, यावर लोकसत्ताक शासनाचें भवितव्य अवलंबून आहे. या गुणांच्या अभावीं आर्थिक क्षेत्रांतल्या कोणत्याहि योजना यशस्वी होणार नाहीत; समाजसंघटना होणार नाहीं; आणि राजकीय क्षेत्रांत कितीहि मूलभूत हक्क मिळाले असले तरी ते असून नसल्यासारखेच होणार. कारण जे कांहीं नवीन घडवावयाचे ते हा मानवच घडविणार असल्यामुळे, भारतीय लोकसत्तेचे खरें धन ते आहे. हे धन काँग्रेसने किती प्रमाणांत प्राप्त करून घेतले हा प्रश्न म्हणजे सर्व प्रश्नांचे सारभूत तात्पर्य आहे.
 भारतीय लोकसत्ताकाच्या गेल्या चार वर्षातील कारभाराचें इतक्या बहुविध दृष्टींनीं परीक्षण केलें, तरच लोकसत्तेच्या दृष्टीनें आपली प्रगति होत आहे की परागति होत आहे, हे कळून येईल. लोकसत्ता ही केवळ राजकीय क्षेत्रांतल्या कारभारापुरती मर्यादित नसते, तर जीवनाचें प्रत्येक अंगोपांग तिने व्यापलेले असतें, हे मागल्या अनेक प्रकरणांतील विवेचनावरून वाचकांच्या ध्यानांत आलेच असेल. आणि हें जर खरे आहे, तर