पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४८
भारतीय लोकसत्ता

संघटन, भाषण, मुद्रण याचें कितपत स्वातंत्र्य आहे या प्रश्नांच्या उत्तरावर भारतीय समाजाच्या राजकीय जीवनाची पुनर्घटना कशी झाली याचें उत्तर अवलंबून राहील,
 आर्थिक दृष्टीने पहातां येथें पूर्वी संस्थानिक, जमीनदार व भांडवलदार यांचे वर्चस्व होते व त्यामुळे भारतीय समाजांत पराकाष्ठेची विषमता होती. या एकारलेल्या संपत्तीचा निचरा करून काँग्रेसनें आर्थिक समता कांहीं अंशीं तरी आणण्यासाठी कोणचे प्रयत्न केले, आणि त्यामुळे दुसऱ्या टोकाचे जे शेतकरी व कामकरी वर्ग त्यांच्या जीवनांत सुखाची भर कितपत पडली, याचा विचार प्रथम झाला पाहिजे. राज्यकारभाराच्या यशाचा हा फार मोठा निकष आहे. त्याचप्रमाणे या देशांत अन्नधान्याचा जो तुटवडा आहे. तो नाहींसा करण्यासाठी येथली भूमि सुपीक व समृद्ध करण्याचे सरकारनें कोणते प्रयत्न केले, शास्त्रीय शेतीची पद्धत आणली काय, पाटबंधारे बांधले काय, सहकारी वा सामुदायिक शेतीचे प्रयोग केले काय, इ. अनेक प्रश्न विचारांत घेतले पाहिजेत. समृद्ध जीवनावांचून लोकशाही यशस्वी होणे अशक्य आहे हे मागे अनेकवार सांगितले आहे. त्या दृष्टीने अन्नधान्याखेरीज इतर जीवनावश्यक धनाचे उत्पादन किती वाढले, त्यामुळे महागाई किती कमी झाली, चलनवाढीस आळा बसला काय, नियंत्रणे कोणच्या हेतून बसविली, त्यांचा परिणाम काय झाला, या सर्वांचा हिशोब झाला पाहिजे. आणि सर्वांच्या शेवटीं, काँग्रेसच्या नेत्यांनी जे आर्थिक धोरण व तत्त्वज्ञान स्वीकारलेले आहे ते मूलतःच कितपत समर्थनीय आहे, याचीहि चिकित्सा आपणांस केली पाहिजे.
 सामाजिक संघटनेच्या दृष्टीनेंहि असेच अनेक प्रश्न निर्माण होतात. अर्थिक विषमतेमुळे समाजाच्या भिन्न गटांत दूरीभाव निर्माण होऊन त्याच्या जशा अनेक चिरफळ्या झालेल्या असतात, त्याचप्रमाणे सामाजिक व धार्मिक भेदामुळेहि समाज भंगलेला असतो. आणि समाजाची ही भग्नावस्था लोकशाहीला आर्थिक विषमतेइतकीच विघातक असते. म्हणून सामाजिक दृष्टीनेंहि समाजाची पुनर्घटना करणें अवश्य असते. भारतीय समाजांत हिंदु व मुसलमान या समाजांचे भिन्न धर्म, भिन्न संस्कृति व भिन्न आकांक्षा हे पहिले भेदकारण आहे. अस्पृश्यता हे जवळजवळ तितकेच मोठे असें दुसरें