पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४६
भारतीय लोकसत्ता

झाडाची फळे सडलेली असली किंवा उत्तम, मधुर, रसपूर्ण असली तर त्याचे श्रेय त्या झाडाचीं मुळे, खोड, फांद्या, पाने, फुलोरा, या सर्वांना असते. कारण त्या फळांचें प्रत्येक क्षणाचें जीवन वरीलपैकी प्रत्येक घटकावर अवलंबून रहाते. लोकायत्त राज्यकारभाराची स्थिति अशीच असते. अर्थात् याचा अर्थ असा नव्हे की, फळांचा आणि वृक्षांचा पृथकूपणें विचार करूं नये. अभिप्राय एवढाच आहे की, फळाचा निषेध करतांना किंवा गौरव करतांना, आपण आपणाहून सर्वस्वी भिन्न अशा एका पदार्थाचा निषेध वा गौरव करीत आहोत, अशी भूमिका वृक्षानें घेणें युक्त नाही. आपल्याच जीवनाचे हे अपरिहार्य फल आहे ही जाणीव वृक्षानें कधींहि मनाआड होऊं देता कामा नये. सध्यां काँग्रेसच्या राज्यकारभारावर टीका करीत असतांना या तत्त्वाचे अवधान बाळगले जाते असे वाटत नाही. राजकारणाच्या आखाड्यांत सत्तेच्या स्पर्धेसाठी उतरलेले लोक असे करतील यांत नवल नाहीं. पण ज्यांना या स्पर्धेच्या क्षेत्रांत पाऊल टाकावयाचें नाहीं ते लोकहिं, काँग्रेस ही कोणी आभाळांतून पडलेली संस्था आहे, तिच्या राज्यकारभारांतील यशापयशाशी आपला कांही संबंध पोचत नाहीं, अशा वृत्तीने टीका करतात ! लोकायत्त शासनाच्या दृष्टीने ही वृत्ति घातुक आहे. पण या विषयाचा तपशिलानें जो विचार करावयाचा तो आपण पुढे करूं, प्रथमतः गेल्या सहा वर्षांतल्या आपल्या कर्तृत्वांचें मोजमाप घेणें अवश्य आहे. म्हणून त्या विषयाकडे आतां वळू.
 काँग्रेसच्या सहा वर्षाच्या राजवटींत लोकशाहीच्या दृष्टीने भारताची प्रगति झाली की परागति झाली, याविषयींचे जे मूल्यमापन आतां करावयाचे आहे, त्याचे विवेचनाच्या सोयीसाठी चार भाग केले आहेत. राजकीय पुनर्घटना, आर्थिक पुनर्घटना, सामाजिक पुनर्घटना व मानव पुनर्घटना या चार दृष्टींनी काँग्रेसच्या कर्तृत्वांचे परीक्षण करावयाचे आहे. भारतीय जीवनाच्या या चारहि अंगांची पुनर्घटना झाल्यावांचून येथे लोकशाही यशस्वी होणे शक्य नाहीं याबद्दल फारसें दुमत होणार नाहीं. हजार दोन हजार वर्षे भारतीय समाजाने जीवनाच्या क्षेत्रांत अंगीकारलेली तत्त्वें लोकशाहीस सर्वस्वीं विघातक अशीं होतीं, वतनदारी, मिरासदारी, जमीनदारी, सरदारी, सरंजामदारी; चातुर्वण्य, जातिव्यवस्था, अस्पृश्यता;