पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४५
पुनर्घटना

होऊन गेली. येथल्या बहुतेक प्रांतांत ही दुरवस्था इंग्रज येईपर्यंत कायम होती. अशा तऱ्हेच्या लोकायत्त शासनाची अल्पहि कल्पना व अनुभव नसलेल्या समाजांत शंभर एक वर्षांत जी काय मनःक्रान्ति झाली असेल तेवढीच जमेस धरून लोकसत्ता प्रस्थापित करण्याचें व ती यशस्वी करून दाखविण्याचे अत्यंत दुर्घट कार्य भारतीयांनी शिरावर घेतले आहे. त्यांनीं प्रारंभिलेल्या या महान् प्रयोगांत त्यांना कितपत यश आलें, त्याचें मोजमाप आतां करावयाचे आहे.
 एका दृष्टीने या प्रयोगांतील भारतीयांचे यशापयश म्हणजे भारतीय राष्ट्रसभेचें यशापयश होय, असे म्हणण्यास हरकत नाहीं. भरतभूमि स्वतंत्र झाली त्यावेळी येथे अत्यंत प्रबळ अशी ही एकच संघटना होती आणि बहुसंख्य जनतेचा तिला मन:पूर्वक पाठिंबा होता. राष्ट्रसभेच्या कर्तृत्वावर आणि चारित्र्यावर भारतीयांची दृढ अशी श्रद्धा होती. तिच्या नेतृत्वाखाली वाटेल ती झुंज करण्यास ते सिद्ध होते. व नव्या राज्यकारभारांत कोणत्याहि क्षेत्रांत तिच्याशीं संपूर्ण सहकार्य करण्याची त्यांची तयारी होती. याचा अर्थ असा कीं, लोकशाहीला अवश्य असे समाजाचे संघटित, सामर्थ्य राष्ट्रसभेला प्राप्त झाले होते. नवीनच प्रस्थापित झालेल्या लोकसत्तेला; ब्रिटन व अमेरिका हे दोन देश सोडले तर, जगांतल्या कोणच्याहि देशांत अशा तऱ्हेचे जनतेच्या अविभक्त सामर्थ्याचें पाठबळ मिळालेले नाहीं. हा चमत्कार, भरतभूमीतच घडलेला आहे. आणि तो टिळक व महात्माजी यांनी घडवून आणलेला आहे हे मागें सांगितलेच आहे. तेव्हां इतरांना सर्वथा दुष्प्राप्य असें जनतेच्या पुण्याईचें सामर्थ्य राष्ट्रसभेच्या मागें उभें होते. म्हणून या लोकशासनाच्या प्रयोगांत जे कांहीं यशापयश आले असेल त्यावर सर्वस्वी तिचॆंच स्वामित्व आहे, असे म्हटले तर एका दृष्टीने ते सयुक्तिकच आहे.
 पण हे सर्व एका दृष्टीनें, आणि ती दृष्टि माझ्या मतें गौण होय. कारण राष्ट्रसभा किंवा तिनें निर्माण केलेले अधिकारी-मंडळ लक्षावधि सामान्यजनांच्या साह्यानेच कारभार हाकीत आहे. ते अधिकारी जनतेतून निर्माण झालेले आहेत. आणि प्रत्येक क्षणीं ते जे कांहीं बरेवाईट कृत्य करतात ते म्हणजे जनतेच्या कार्यक्षमतेचा आविष्कार असतो. एखाद्या