पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'भारतीय जीवनाची पुनर्घटना'


प्रास्ताविक


 १५ ऑगस्ट १९४७ या शुभदिनीं भरतभूमि स्वतंत्र झाली आणि स्वतःचा ललाटलेख स्वतःच लिहिण्याची, शेंकडों वर्षांत न मिळालेली, अपूर्व संधि तिच्या नागरिकांना प्राप्त झाली. त्याच्या आधींच्या शंभर वर्षांत होऊन गेलेल्या राममोहन, रानडे, टिळक, आगरकर, महात्माजी, सुभाषचंद्र या थोर विभूतींनी भारतीयांना हा ललाटलेख लिहिण्यास शिकविण्यासाठी कोणचे परिश्रम केले, कोणती तपश्चर्या केली, आणि वारसा म्हणून कोणचे धन मागें ठेविलें, याचे विवेचन मागील प्रकरणांतून केले. आतां पूर्वसूरींनीं शिकविलेली ही अद्भुत लेखनकला गेल्या सहा वर्षांत आम्हीं भारतीयांनी कितपत हस्तगत केली आहे, त्याचा विचार करावयाचा आहे.
 भारतीय लोकसत्तेचा प्रयोग हा जगाच्या इतिहासांतील एक अलौकिक, अभूतपूर्व व पराकाष्ठेचा दुःसाध्य असा प्रयोग आहे, हें आरंभींच्या प्रकरणांत सांगितलेंच आहे. इतक्या विस्तीर्ण भूप्रदेशावर, इतकी अफाट लोकसंख्या असलेल्या समाजांत जगांत अजूनपर्यंतच्या इतिहासांत कोठेंहि लोकसत्ता प्रस्थापित झालेली नाहीं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असलेला हा पहिलाच प्रयोग आहे. त्यांतूनहि हा प्रयोग करणारे जे भारतीय नागरिक त्यांना पूर्वपरंपरेचा कांहीं आधार व पाठबळ असतें तर गोष्ट निराळी होती. पण तसेंहि नाहीं. इंग्रज येण्यापूर्वीच्या दोन हजार वर्षांचा काळांत लोकसत्ता या शब्दाचा या भूमीत कोणी उच्चार तरी केला असेल की नाही याचीच शंका आहे. मग तिच्या प्रस्थापनेसाठी अवश्य तो मनोवृत्तीचा पालट हा लांबच राहिला. पहिल्या हजार वर्षांत लोकसत्ता नसली तरी निदान या भूमित स्वातंत्र्य तरी नांदत होते. दुसऱ्या हजार वर्षात ते धनहि येथून हरपले आणि पारतंत्र्य, दास्य व त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अज्ञान, दारिद्रय, कलह, अंधधर्म, अविवेक इत्यादि अनेक रोगांनीं भारतीय जनता जर्जर