पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४३
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

उग्र, मदांध दण्डसत्ता, तेथील अंध शब्दप्रामाण्य, तेथील मानवतेचें अत्यंत हीन झालेले मूल्य, तेथील व्यक्तिस्वातंत्र्याचा नाश, तेथील कम्युनिस्ट साम्राज्यशाही, यांचा विचार मनांत येऊन टिळक-महात्माजींना विसरणे ही केवळ आत्मह्त्या आहे याविषयीं खात्री पटते, पण आम्ही त्यांचा वारसा सांगण्यास नालायक ठरलो तर इतिहास मात्र वरील प्रकारचा निर्वाळा दिल्याखेरीज रहाणार नाहीं. तेव्हां यापुढे भारताच्या भवितव्याला दोन भिन्न प्रकारांनीं वळण लागणे शक्य आहे. विवेक, संयम, त्याग, नीति हीं कठोर व्रते आम्ही आचरली तर लोकशाही यशस्वी करून टिळक-महात्माजी यांची परंपरा पुढे चालविल्याचे श्रेय आम्हांला मिळेल; पण या गुणांचा विकास येथील जनतेनें केला नाहीं तर ? 'टिळक महात्माजी येथे झाले; पण त्यांना भरतभूमीत वारस लाभले नाहीत, केवळ वंशज लाभले. उग्र, क्रूर, शब्दप्रामाण्याधिष्ठित, व्यक्तिस्वातंत्र्यहीन अशा मार्क्सप्रणीत दण्डसत्तेचीच यांची लायकी होती; पण भलत्याच विभूतींशीं नातें जोडण्याच्या मोहानें यांनी लोकसत्ताहि घालविली व दण्डसत्ताहि घालविली आणि स्वतःवर अराजक व पारतंत्र्य मात्र ओढवून घेतले.'-- असा अभिप्राय इतिहासकार आमच्याबद्दल लिहून ठेवतील !
 स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पांचसहा वर्षात लोकशाहीला अवश्य अशा त्या बहुमोल सद्गुणांची जोपासना आपण कितपत केली ते आतां पहावयाचे आहे.