पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४०
भारतीय लोकसत्ता

त्या तऱ्हेनें पण शांततेच्या मार्गाने येथे ती चालविण्यांत आली, तर शेतकऱ्यांत सामाजिक प्रबुद्धता निर्माण होईल, सामुदायिक जीवनाचा पाया घातला जाईल, उत्पादनाचा निकडीचा प्रश्न बराचसा सुटेल आणि जनता समर्थ होऊन राजकारणांतील इतर सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गाला लागतील. सुविद्य तरुण यांत किती संख्येने सामील होतात त्यावर त्या भूमीचे भवितव्य अवलंबून राहील. याच ग्राम- पुनर्घटनेच्या कार्यक्रमाचा अवलंब करून चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने अगदी अक्षरशः धुळींतून नवे विश्व निर्माण केले आहे. येथील समाजवादी पक्षांची पावले त्याच दिशेनें पडत आहेत. ही वाटचाल किती वेगानें होते हें त्याग, चिकाटी, निष्ठा, नेत्यांचें संघटनाकौशल्य व सुशिक्षित मध्यमवर्गीयांची राष्ट्रनिष्ठा यांवर अवलंबून आहे.
 समाजवादी पक्षाच्या कार्याविषयी काही विवेचन वर केले, पण या पक्षाचें मूल्यमापन करतांना एक गोष्ट सांगावीशी वाटते ती ही की, त्याचें महत्त्व त्याने आतांपर्यंत केलेल्या कार्यामुळे वाटत नसून त्या कार्यामुळे त्याच्या भविष्यकालीन कर्तृत्वाविषयीं जी आशा निर्माण होते तिच्यामुळे वाटते. कारण प्रत्यक्ष कार्य या दृष्टीने पाहिले तर सिद्ध असे फारच थोडे झालेले आहे. गेल्या सोळा वर्षांत तत्त्वांची निश्चिति, मार्गाची आंखणी, साधनांची जमवाजमव, मनुष्यबळाचा संग्रह, पुण्याईची निर्मिति हा पायाभरणीचाच कार्यक्रम चालू आहे. अजून पक्षाच्या जमेला इतिहासांत नमूद करून ठेवण्याजोगे कांहीं नाहीं. ४२ चा लढा हा त्याच्या नांवें जमा आहे; पण त्या लढ्याच्या यशामागची सर्व पुण्याई काँग्रेसची होती. यामुळे तें स्वतंत्र कर्तृत्व होऊं शकत नाहीं. पण आपल्या पराक्रमासंबंधीं या पक्षाच्या नेत्यांच्या मनांतहि भ्रामक कल्पना नाहींत असे दिसते. जयप्रकाश नारायण यांनी १९४८ सालीं नाशिकला भरलेल्या अधिवेशनाच्या वेळीं जो अहवाल सादर केला त्यांत पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला आहे. अन्यत्रहि अशा तऱ्हेचें सिंहावलोकन पक्षाच्या इतर नेत्यांनी केले आहे. त्या सर्वावरून हेच ध्यानांत येईल की आपण एक मोठी शक्ति निर्माण करीत आहोत, एवढीच नम्र व शालीन कल्पना या पक्षाने स्वतःच्या कर्तृत्वाविषय ठेवली आहे. पण ती कल्पना मात्र अत्यंत अर्थगर्भ अशी आहे. पांचदहा वर्षांत देशाच्या जीवनाला वळण लावण्याचे सामर्थ्य हा पक्ष स्वतःच्या ठाय निर्माण करील