पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३९
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

आहे असे नाहीं; पण हिंदुस्थानांतील सध्यांच्या परिस्थितीत शांततामय सत्याग्रहाचाच अवलंब करणे श्रेयस्कर होय, असे या पक्षानें निश्चित ठरविले आहे. (जयप्रकाश नारायण. डेमोक्रॅटिक सोशलिझम- पृ. ९) रक्तपाती क्रांतिवाद हा मार्क्सवादाचा आत्माच आहे. असें असूनहि या पक्षानें सत्याग्रहावर निष्ठा ठेवावी हें या देशाचें सुदैव आहे. वर एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सत्याग्रह ही महात्माजींची लोकशाहीच्या तत्त्वाला एक अलौकिक अशी देणगी आहे. सशस्त्र क्रांतीनें सरकार बदलणे हे लोकशाहीला संमत नाहीं. तो लोकशाहीचा अंतच होय. पण केवळ निवडणुकीच्या मार्गानें दर वेळीं प्रत्येक देशांत जुलमी, मदांध व धनादि साधनांमुळे समर्थ असलेले सरकार पदच्युत करता येईल असे नाही. अशा स्थितीत सत्याग्रह हा एकमेव मार्ग आहे. त्याचा अवलंब करावयाचा, या धोरणाला या पक्षाने स्वतःला बांधून घेतले आहे. लोकायत्त देशांतील दोन पक्षांतील झगड्यांत या साधनाचा कसा उपयोग करतां येतो, हें जर या पक्षाने पुढील काळांत दाखवून दिले, तर लोकशाही त्याची फार ऋणी होईल.
 आणखी एक महत्त्वाचा उपक्रम या पक्षानें अलीकडे सुरू केला आहे. भारताची पुनर्घटना करून त्यांतील खेड्यांत सामूहिक जीवन निर्माण करावें व लोकसत्ता हा जो सामुदायिक जीवनाचा परमोच्च विकास त्याचा पाया घालावा असा हा उपक्रम आहे. 'देश के लिये एक घंटा' अशी ते तरुणांना साद घालीत आहेत. आणि अशा सुविद्य तरुणांची सेवकसेना खेड्यांत नेऊन तेथें पाटबंधारे घालणे, रस्ते करणे, नाले खणणे, सामुदायिक शेती करणें, सहकारी संस्था उभारणे इ. कार्ये खेडुतांच्या सहकार्याने करावयाची असा हा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रांत सानेगुरुजीसेवापथकानें गेल्या काही वर्षांत या तऱ्हेनें कांहीं कार्य केले आहे. आणि बिहार, उत्तर प्रदेश येथे स्वतः पक्षाच्याच नेतृत्वाने प्रचंड प्रमाणावर ही चळवळ चालू झाली आहे. (साधना- सेवापथक विशेषांक ११ जून १९५१. भारतज्योति १० जून १९५१ 'दी पीपल ऑन दि मार्च ' - मधु लिमये) ही चळवळ आज बाल्यावस्थेत असली तरी तिला फार मोठा अर्थ आहे व म्हणूनच फार मोठे भवितव्य आहे. चिनी कम्युनिस्टांनी ज्या तऱ्हेनें ही चळवळ चालविली