पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४१
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

अशी चिन्हें मध्यंतरी दिसत होती. कामगारसंघटना, कृषकसंघटना व विद्यार्थी संघटना या तीनहि क्षेत्रांत पक्षाचें कार्य अखंडपणे अजूनहि प्रगत होत आहे. अनेक स्थानिक क्षेत्रांतील संग्रामांत पक्षाच्या नेतृत्वानें चाललेल्या संग्रामांना भावी काळाच्या दृष्टीनें अर्थ आहे असे वाटते. भारताच्या प्रत्येक प्रांतांतील कानाकोपऱ्यांत आपली हांक पोंचवून पक्षाला अखिल भारतीय स्वरूप देण्यांत इतर कोणच्याहि नव्या पक्षाला जे यश आलें नाहीं, तें समाजवादी पक्षाला कदाचित् येईलहि. या सर्व लक्षणांवरून स्वार्थ, अनीति, अधमपणा यांनीं भ्रष्ट झालेले; क्षुद्र अहंकार, मत्सर व कलहवृत्ति यांनीं छिन्नभिन्न झालेले; आणि दारिद्र्य, उपासमार व शोषण यांनी हीनदीन झालेले भारतीय जीवन हा पक्ष पुन्हां संघटित व समृद्ध करूं शकेल अशी एखादे वेळी आशा वाटते.
 मार्क्सवाद जन्माला येऊन आज शंभरएक वर्षे झाली. तेवढ्या अवधीत मार्क्सच्या प्रेरणा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचल्या आहेत आणि त्याच बलशाली प्रेरणांच्या पुण्याईनें रशिया व चीन या दोन राष्ट्रांनी आपला कायाकल्प करून घेतला आहे. गेल्या अनेक शतकांत जे सामर्थ्य व बल या राष्ट्रांना प्राप्त झाले नव्हते, ते एका पाव शतकाच्या आंतच निर्माण करण्यांत तेथील कम्युनिस्ट पक्षांना यश आले आहे. मार्क्सचा असा प्रभाव भरतभूमींत पडला नाहीं; पण त्याचे कारण मात्र फार निराळे आहे. मार्क्सवाद येथे येण्यापूर्वीच टिळंक व महात्माजी यांच्या कर्तृत्वाने या भूमींत क्रांतीचें तत्त्वज्ञान प्रसृत होऊन गेले होते. येथें रशिया व चीन येथल्याप्रमाणें जुनाट, अंध, क्रूर व मदांध अशी सरंजामदारी सत्ताच अधिष्ठित असती, तर येथेंहि मार्क्सवाद आगीसारखा पसरला असता. पण मार्क्स जन्माला येण्याच्या आधीपासूनच भरतभूमीत राममोहनांसारख्या पुण्यपुरुषांनी सामाजिक पुनर्घटनेचें कार्य चालू केले होते व पुढे टिळक व महात्माजी यांनी ते परिणतीस पोचविलें होतें. मात्र असे करतांना त्यांनी लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, समता या मार्गांचा अवलंब केला. त्यामुळे या देशाचें नवें रूप वरील देशांपेक्षां अगदी निराळे झाले. येथील जनतेची मनोभूमि मार्क्सवादाला मुळींच
 भा. लो.... १६