पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३८
भारतीय लोकसत्ता

फार दूर होतें. (पृ. ३७५)' अशा तऱ्हेचे उद्गार पंडितजींच्या आत्मचरित्रांत ठायी ठायीं आढळतात. पंडितजींचे व्यक्तिमत्व अलौकिक असल्यामुळे व पुढे कांही काळाने सर्व तरुणांची मनें त्यांनी आपल्याकडे खेचून घेतल्यामुळे भोळ्या, श्रद्धाळू अध्यात्मवादापासून भारतीय तरुण मुक्त झाले. पंडितजींचे हेच कार्य समाजवादी पक्षाने पुढे चालू ठेवून विवेकनिष्ठा व बुद्धिवाद यांची छाप तरुण मनावर बसविण्यांत बरेचसे यश मिळविले आहे.
 पक्षाच्या बुद्धिवादी विवेकनिष्ठेची प्रतीति त्यानें गुरुस्थानी मानलेल्या मार्क्सवादाकडे पहाण्याच्या त्याच्या वृत्तीवरून सहज येऊं शकते. सध्यांच्या काळांत मार्क्सवाद ही एक अंधनिष्ठाच झाली आहे. तिच्या आहारी गेलेला माणूस हेकट, दुराग्रही, एकांतिक आणि पिसाट असाच बहुधा होतो आणि लोकसत्तेचा तो कट्टा शत्रु बनतो. मार्क्सवादाचे स्वतःला अनुयायी म्हणवीत असूनहि समाजवादी लोक या वळणावर गेले नाहीत हे फार मोठे सुदैव आहे. मार्क्सवादांत क्रांतीची प्रचंड प्रेरणा आहे आणि तिचे सामर्थ्यहि अगदीं अतुल असें आहे. पण मार्क्सचीं कांहीं तत्त्वें अशीं आहेत कीं तीं माणसाला प्रज्ञाहत बनवितात. समाजवादी पक्षाने सावध राहून मार्क्सवादांतील क्रांतीची प्रेरणा तेवढी घेऊन दुसरी आपत्ति टाळण्यांत बरेंच यश मिळविले आहे असें वाटते. कामगारवर्गाचे नेतृत्व, विरोधविकासवाद, राष्ट्रनिष्ठा, शासनसंस्थेचे भवितव्य इ. मार्क्सप्रणीत सिद्धान्तांचे या पक्षांतील अशोक मेहता, आचार्य जावडेकर, कर्णिक, लोहिया, लिमये यांनी चालविलेले परीक्षण पाहिले म्हणजे यांनी मार्क्सची गुलामगिरी पत्करलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येते. जयप्रकाश नारायण यांचे गेल्या पंधरा वर्षांतले लेखन वाचून हाच प्रत्यय येतो. मार्क्सवादांतील अगदी मूलभूत सिद्धान्तहि त्यांनी अंधपणें स्वीकारलेले दिसत नाहीत. रशियन क्रांति, गांधीवाद, राष्ट्रनिष्ठा याकडे चिकित्सक दृष्टीनें पहाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे लोकशाहीला अनुकूल अशी विवेकदृष्टि समाजांत निर्माण करण्यांत त्यांना यश येईल असा भरवसा वाटू लागतो.
 याच चिकित्सक दृष्टीमुळे मार्क्सवादांतील अत्याचारी क्रांतिवाद या पक्षाने स्वीकारलेला नाहीं. सशस्त्र क्रांतीला तत्त्वतःच या पक्षाचा विरोध