पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३७
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

बाजूला ठेवून काँग्रेसशी सहकार्य करण्या धोरण ठेवलें, हे होय. हा पक्ष १९३४ सालीं स्थापित झाला असला तरी त्याची खरी प्राणप्रतिष्ठा १९४२ च्या लढ्याच्या वेळीं झाली. त्या राष्ट्रीय संग्रामांत समाजवादी पक्षानें जें थोर कार्य केले यामुळे त्याचे या देशांतील स्थान अढळ होऊन गेले. त्याला एक प्रकारचा अधिकार प्राप्त झाला व समाज त्याच्याकडे आशेने पाहूं लागला.
 लोकशाहीच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे कार्य या पक्षानें केलें आहे. महात्माजींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसवर व एकंदर भारतीय समाजावर अध्यात्माचें वर्चस्व बसू पहात होतें. अतींद्रिय शक्तीच्या आवाहनानें सामर्थ्य प्राप्त होतें, परमेश्वरी प्रसादानें कार्ये सफल होतात, बुद्धीपेक्षां शुद्ध भावाला महत्त्व जास्त आहे, ही घातक विचारसरणी दृढमूल होऊं पहात होती. याचें सविस्तर विवेचन गांधीवादाचें परीक्षण केले तेव्हां केलेच आहे. लोकशाहील मारक व अत्यंत प्रतिगामी अशा या विचारसरणीपासून समाजवादी अगदी अलिप्त आहेत. भाबडया अध्यात्मवादाला पायबंद घालून समाजाला बुद्धिवाद व विवेकनिष्ठा यांचे महत्त्व पटवून देण्याचें बरेंचसे कार्य पंडित जवाहरलाल यांनी केले आहे. पंडितजी काँग्रेसमध्यें नसते तर तिचा अंधश्रद्धावाद कोणत्या थराला गेला असता ते सांगवत नाहीं. 'काँग्रेसला एखाद्या भजनी मंडळाचे रूप येऊं पहात आहे !' असे आत्मचरित्रांत पंडितजींनी म्हटले आहे. आणि त्या वृत्तीची चीड आल्यामुळेच त्यांनी कसली हि भीडभाड न ठेवतां महात्माजी व काँग्रेस यांवर कडक टीका केली आहे. 'असहकारितेच्या चळवळीला धार्मिक पुनरुज्जीवनाचे स्वरूप येऊ लागले आहे. काँग्रेसमधील नाफरेवाले हे शब्दप्रामाण्यवादी आहेत. (आत्मचरित्र पृ.- १०७) राजकारणांत गांधीजींची वृत्ति शास्त्रीय नव्हती. त्यांचा सर्व भार शीलावर, साधनशुद्धीवर आहे. बौद्धिक विकास व बौद्धिक शिक्षण ते क्षुद्र गणतात. (पृ. ५१२). लोकांनी स्वतः विचार करावा असा गांधीजींचा आग्रह नव्हता. आत्मशुद्धि व त्याग यांवर सगळा भर. (पृ.३७५) श्रद्धेनें कांहींकाळ फायदा होईल, पण लोकांना शहाणे करावयाचे असेल तर हा मार्ग योग्य आहे काय ? ही सर्व जुनी विचारसरणी आहे. जुन्या आशा, आकांक्षा, एकंदरीत जीर्ण जगाचेच वातावरण माझ्या सहकाऱ्याभोवती पसरले आहे असे मला वाटते. मला हवें असलेले नवें जग अद्याप