पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३६
भारतीय लोकसत्ता

होतें आणि काँग्रेसला ते मत मान्य नसल्यामुळे या पक्षाला आपली निराळी संघटना करावी लागली.
 १९३० सालापासून जयप्रकाश नारायण, नरेन्द्र देव, अच्युत पटवर्धन, ना. ग. गोरे, कमलादेवी चट्टोपाध्याय, पुरुषोत्तमदास त्रिकमदास, साने गुरुजी इ. काँग्रेसमधील तरुणांना काँग्रेसचें जमीनदार- भांडवलदारांच्या आहारी जाण्याचे धोरण नापसंत होऊं लागले. अशा या तरुणांनी काँग्रेसच्या छायेंतच संघटित व्हावयाचें ठरवून १९३४ साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. काँग्रेसशीं समाजवादी भूमिकेविषयीं व भांडवलदार- जमीनदार यांच्याबद्दलच्या धोरणाविषयी जरी यांचे मतभेद असले तरी आपला खरा लढा साम्राज्यशाहीशीं आहे व भारताचे राष्ट्रीय स्वातंत्र्य हे आपले पहिले प्राप्तव्य आहे, या तत्त्वाचा या पक्षाला कम्युनिस्टांप्रमाणे केव्हांहि विसर पडला नव्हता आणि या जाणीवेमुळेच त्यांनीं काँग्रेसमधून फुटून निघावयाचें नाहीं हें निश्चित ठरवून तो आपला निश्चय स्वातंत्र्याची प्राप्ति होईपर्यंत टिकवून धरला. हा विवेक व ही जी समंजसता समाजवादी पक्षाने दाखविली ती त्यास भूषणावह आहे. ब्रिटिश साम्र ज्यशाहीशीं झगडा करणारी काँग्रेस ही एकमेव संस्था आहे व तिच्यामागें भारताची अखिल पुण्याई उभी आहे, या गोष्टीचा या पक्षाला विसर पडला नव्हता. पक्षाच्या स्थापनेच्या वेळी सादर केलेल्या अहवालांतच जयप्रकाश नारायण यांनीं हें धोरण स्पष्ट करून सांगितले आहे. 'काँग्रेसपासून फुटून निघणे अगदीं मूर्खपणाचें असून तो आपल्या शक्तीचा केवळ अपव्यय आहे. ब्रिटिशांशी लढणारी ती एकच संस्था आहे. तिच्यांत कांहीं उणीवा असल्या तर त्या भरून काढून तिला जास्त समर्थ करणे हेच पक्षाचें खरें कार्य आहे. ज्यांना हें मत मान्य नसेल त्यांना समाजवादी पक्षांत स्थान नाहीं.' असें अगदीं निःसंदिग्ध शब्दांत जयप्रकाश यांनी बजावलेले आहे. या पक्षाला भारतांत आज थोडें मानाचे स्थान आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्यांत त्याला काहींसें यश येत आहे आणि कांहीं विचारवेत्यांच्या मतें भारताचें भावी काळांतील हा पक्ष म्हणजे आशास्थान आहे. इतकी पुण्याईं निर्माण होण्याचे प्रधान कारण म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीशी झगडा करण्याची जबाबदारी या पक्षाने कधींहि टाळली नाहीं आणि त्या उद्दिष्टासाठीं मतभेद