पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३५
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

मग त्याच्याशी आपला शेतकरीक्रांतीचा कार्यक्रम स्थगित करूनहि सहकार्य केले. आणि भारतांत साम्राज्यविरोधी लढा हें एकमेव ध्येय कोंग्रेसनें डोळ्यापुढे ठेवलेले असतांना मार्क्सवादी पोपटपंचीचा आश्रय करून येथील कम्युनिस्टांनी तिच्याशीं एकदांहि सहकार्य केले नाहीं. उलट ब्रिटिश साम्राज्यशाहीशींच सहकार्य केले. एकाच मार्क्सवादाला दोन देशांत हीं किती भिन्न फळे आलीं !
 कम्युनिस्टांच्या अलीकडच्या या सर्व लीला पाहिल्या म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दलच नव्हे तर हेतूच्या शुद्धतेबद्दलहि जबर शंका येऊ लागतात. आणि रशियन साम्राज्यशाहीचे हे हिंदुस्थानांतील स्वजनद्रोही हस्तक आहेत हे समाजवादी पक्षानें व काँग्रेसनें त्यांच्यावर केलेले आरोप खरे आहेत असें वाटू लागते; आणि हे आरोप खरे असतील तर भारतीय लोकसत्तेचा त्यांनीं विनाश न केला तरच नवल. त्यांचे हेतु शुद्ध असले तरी त्यांचे घातपाती धोरण, त्यांची मार्क्सवरील अंधनिष्ठा, त्यांची भ्रामक विचारसरणी- म्हणजे एकंदरीत त्यांचे तत्त्वज्ञान हे लोकशाहीला पुरेसे मारक आहे. मग त्यांत कृष्ण हेतूंची भर पडली तर कोणता अनर्थ होईल हे सांगावयास नकोच, या पक्षाचे कधीं काळी दुर्दैवाने या भूमीवर वर्चस्व प्रस्थापित झालेच तर झेकोस्लोव्हाकिया, बल्गेरिया, पोलंड या देशांसारखे रशियाचे दास्य, स्वत्वहीनता व व्यक्तित्वशून्यता तिच्या कपाळी येऊन लोकशाहीच्या उदात्त तत्त्वांचा येथून समूळ नाश झाल्याखेरीज रहाणार नाही.

समाजवादी पक्ष

 मार्क्सप्रणीत तत्त्वज्ञानान्वयें भारतांत चळवळ व संघटना करणारा दुसरा पक्ष म्हणजे भारतीय समाजवादी पक्ष होय. गेल्या प्रकरणांत काँग्रेसच्या धोरणाविषयीं पंडित जवाहरलाल यांची जी भूमिका विशद करून सांगितली आहे, तीच जवळजवळ या पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसचें केवळ राष्ट्रवादी धोरण या पक्षाला अमान्य आहे. शेतकरी व कामकरी यांची संघटना करून जमीनदार- भांडवलदार वर्गाविरुद्ध लढा पुकारला पाहिजे आणि तो लढा ब्रिटिशांशीं स्वातंत्र्याचा लढा चालू असतांनाच सुरू केला पाहिजे; साम्राज्यशाहीशी चालविलेल्या लढ्याचा तो एक भागच आहे, असे या पक्षाचें मत