पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३४
भारतीय लोकसत्ता

दुसरे महातत्त्वहि चिनी कम्युनिस्टांनी दृष्टिआड होऊं दिले नाहीं. 'परतंत्र राष्ट्राचे पहिले कर्तव्य स्वातंत्र्यप्राप्ति हे होय, समाजवाद नव्हे. परतंत्र राष्ट्रानें कम्युनिझमची चर्चा करण्यांतसुद्धा अर्थ नाहीं, राष्ट्रीय स्वातंत्र्य हेच त्याचें पहिले कर्तव्य होय.' असे माओ त्से तुंगचे स्पष्ट उद्गार आहेत. (रेड स्टार ओव्हर चायना एडगर स्त्रो. पृ. ४१७). चिनी कम्युनिस्ट पक्षाचें कार्यहि याचीच साक्ष देईल. १९२१ पासून १९४९ साली चीनवर पक्षाचें राज्य स्थापन होईपर्यंत राष्ट्रीय स्वातंत्र्य व साम्राज्यशाहीशी लढा हे दोनच कार्यक्रम त्यांनी डोळ्यापुढे ठेवले होते व या लढ्यासाठी चिनी शेतकऱ्यांच्या प्रचंड सेना तयार करून राष्ट्रीय संग्रामाच्या अग्निदिव्यांतून त्यांनीं नवचीन निर्माण केला आणि याच वेळी हजारों खेड्यांतून स्वायत्त शासनाचे शिक्षण देऊन लोकशाहीचा पाया घातला. सामान्य मानवांतील स्वाभिमान जागृत करून त्याला आक्रमणाला तोंड देण्यास, साम्राज्यशाहीशीं लढा करण्यास सिद्ध करणे हा स्वायत्त शासन पेलण्यास त्याला समर्थ करण्याचा एकच उपाय आहे, हे टिळकमहात्माजींनी जितके जाणले होते तितकेच चिनी कम्युनिस्टांनीं जाणले होते असे दिसतें. राष्ट्रीय संघटना करण्यांत त्यांना यामुळेच यश प्राप्त झाले आहे. याच सत्याचें ज्ञान हिंदुस्थानांतील कम्युनिस्टांना झाले असते तर !
 हे ज्ञान त्यांना स्वतःला तर झालें नाहींच, पण ज्या दोन विभूतींना झाले होते, त्यांची निरर्गल निंदा करणे यांतच भूषण आहे, असे विपरीत धोरण त्यांनी अंगीकारले होतें. पाम दत्त नांवाच्या कम्युनिस्टाच्या मतें टिळकांच्या पक्षाला राजकीय तत्त्वज्ञानच नव्हते ! टिळकांना नवीन सामाजिक व राजकीय दृष्टि प्राप्त झालेली नव्हती ! (इंडिया टुडे पृ. २६८). आणि गांधींची सत्यनिष्ठा, अहिंसा व इतर तत्वे म्हणजे जनतेची चळवळ हाणून पाडण्याचे हुकमी साधन होतें ! (उक्त ग्रंथ पृ. २९५) अशा तऱ्हेचीं बालिश मते असल्यामुळे येथल्या कम्युनिस्टांनी काँग्रेसशीं कधींहि सहकार्य केले नाहीं. चिआंग कै शेकचे जपानी साम्राज्यशाहीशी लढा नाहींच करावयाचा असे व्रत होते. हा लढा करावा असे प्रतिपादन करणाऱ्या हजारों तरुणांची त्यानें कत्तल केली. अशा चिआंगला जबरदस्तीनें पकडून कम्युनिस्टांनी त्याला मारूनमुटकून जपानशीं लढा करण्यास तयार केलें व