पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३३
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

मजुरांच्या हितसंबंधाचे दोनचार प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या संपांना कधीच येणार नाहीं. कामगारांच्या लढ्यांना प्रारंभ जरी संपापासून झाला, तरी साम्राज्यशाहीशी करावयाच्या लढ्याचा एक भाग, हे त्याचे स्वरूप कधींच दृष्टीआड होता कामा नये. कारण कामगारांचे खरे शत्रू साम्राज्यशहा हेच असतात. भांडवलदार, जमीनदार, संस्थानिक हे त्यांचे हस्तक म्हणून त्यांचें स्थान गौण असतें. आणि म्हणूनच प्रत्येक आर्थिक लढा हा राजकीय लढा असला पाहिजे हे मार्क्सवादांत आद्य तत्त्व म्हणून स्वीकारलेले आहे. पण सोव्हिएट रशियाच्या अंकिततेमुळे येथील कम्युनिस्टांना या तत्त्वाचाहि विसर पडला आणि कामगारवर्ग ही भारताची एक मोठी शक्ति यांनी परक्यांच्या हितासाठी कायमची पंगु करून ठेवली. साम्राज्यशाहीशीं मुकाबला केल्याने अंगांत निर्माण होणारे तेज व सामर्थ्य त्यांनीं जन्माला येऊंच दिले नाहीं.
 चिनी कम्युनिस्टांना स्वतंत्र प्रज्ञा, अभिजात दृष्टि व स्वयंकर्तृत्व यांची जोड लाभल्यामुळे आपल्या राष्ट्राची त्यांनी किती अलौकिक सेवा केली पहा. जपानी साम्राज्यशाहीशीं लढा हे आपले ध्येय त्यांनी कर्धीहि दृष्टिआड होऊ दिले नाही आणि त्यासाठी प्रथम सन्यत्सेनशीं तर त्यांनी सहकार्य केलेंच, पण पुढे चिआंग कैशेकनें जपानशीं लढण्याचे मान्य करतांच १९३६ साली कोमिंटांगसारख्या अत्यंत प्रतिगामी व अधम अशा पक्षांशी सुद्धां सहकार्य केलें. सियान येथें चिआंगला मांचूरियन सैन्यानें पकडलें, त्या वेळीं कम्युनिस्टांच्या मध्यस्थीमुळेच तो जिवंत सुटला. आणि त्याला ठार केले तर देशांत यादवी माजून जपानी साम्राज्यशाहीशी लढा करणे अशक्य होऊन बसेल हे जाणूनच कम्युनिस्टांनी या आपल्या हाडवैऱ्याला जिवंत सोडून त्याच्या प्रतिष्ठेला अणुमात्र धक्का लागणार नाही अशी दक्षता घेतली. आणि नंतर त्याच्या हाताखाली आपल्या सेना देऊन साम्राज्यशाहीशी लढा चालू केला. हे सहकार्य यशस्वी व्हावे म्हणून त्यांचे अधिराज्य असलेल्या वायव्य सरहद्द प्रांतांत त्यांनीं कांहीं काळ जमीनदारांशी चालू केलेला संग्राम स्थगित करण्याचेंहि अभिवचन दिले आणि ते कसोशीने पाळले. कारण जपान हा खरा शत्रू असून जमीनदार-भांडवलदार हे त्याचे हस्तक होत, हे सत्य त्यांना चांगले उमगले होते. साम्राज्यशाहीशी लढा या तत्त्वाप्रमाणेच राष्ट्रनिष्ठा हे