पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३२
भारतीय लोकसत्ता

जगांतल्या लोकशाहीची चिरंतन सेवा केली आहे. पण दुर्दैवानें कम्युनिस्ट जातीचे लोक हे महासत्य आकळू शकत नाहीत आणि रशियाहून येणाऱ्या संदेशाप्रमाणे घातपाताचा अवलंब करून भारतीय लोकसत्तेचा ते कायमचा नाश करूं पहात आहेत.

साम्राज्यशाहीशी लढा नाहीं.

 पण एवढेहि करून ज्या साम्राज्यशाहीच्या शत्रुत्वाचे कंकण जन्मतःच या पक्षानें हातांत बांधले होते, त्या ब्रिटिश साम्राज्यशाहीशी या पक्षाने लढा चालविला असता तर भारतीय जनता अंशतः तरी त्याची ऋणी झाली असती. कारण अज्ञान, दास्य, दारिद्र्य यांत हजारो वर्षे खितपत पडलेल्या तेजोहीन, प्रतिकारशून्य जनतेला स्वतःच्या हक्कासाठी, आपल्या बांधवांसाठी व आपल्या स्वाभिमानासाठी लढा करण्यास उद्युक्त करणें, तिच्या पाठीचा कणा ताठ करून मरणमारणसंग्रामाला तिला सिद्ध करणे ही लोकशाहीची आणि मानवतेची फार मोठी सेवा आहे. पण तोंडाने साम्राज्यशाहीशी लढा हे पालुपद चालू ठेवणाऱ्या या पक्षाने स्वतंत्रपणे ब्रिटिशांशी कधींहि लढा कला नाहीं आणि काँग्रेसने जे लढे केले त्यांपैकी एकांतहि भाग घेतला नाहीं. शेवटच्या ४२ च्या लढ्यांत तर स्वदेश, जनता व कामगार यांशीं द्रोह करून त्या साम्राज्यशाहीशीच सहकार्य केले. आणि हे कृत्य म्हणजेच कम्युनिस्ट पक्षाच्या पुरोगामित्वाचें कमालीचे भूषण होय, असे पाम दत्तासारखे लेखक जगाला सांगत आहेत ! (इंडिया टुडे-पृ. ३५३).
 कम्युनिस्टांनी १९२० सालानंतरच्या पंधरावीस वर्षांत कामगारवर्गात जागृति करून गिरणी-कारखान्यांतून अनेक संप घडवून आणले; पण या लढ्यांना जोपर्यंत राजकीय स्वरूप येत नाही, तोपर्यंत हे संप म्हणजे कामगार वर्गाच्या स्वतःच्या कामाच्या तासांच्या व मजुरीच्या तक्रारी दूर करण्याचे एक साधन ठरून त्यांना उदात्त य व्यापक प्रतिष्ठा प्राप्त होत नाहीं. राष्ट्रीय लढ्यामागले थोर तत्त्वज्ञान, अखिल देशबांधवांच्या कल्याणासाठी त्याग करण्याची त्याच्या मागची भूमिका, एका मानवसमूहाच्या सांस्कृतिक उंचीसाठी आत्मार्पण करण्याची त्यामुळे मनाला मिळणारी शिकवण हे जे ब्रिटिश साम्राज्यशाहीशी होणाऱ्या लढ्याचें वैभव ते केवळ