पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३१
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

तिला एक अर्वाचीनतेचें व अद्यावततेचें भ्रामक आवरण असल्यामुळे ती एका दृष्टीने जास्तच घातक आहे.

हिंस्त्र मार्ग

 उत्पात, विध्वंस यांवांचून समाजाची प्रगति नाहीं, या मार्क्सप्रणीत विरोधविकासवादांतील दुसऱ्या एका तत्त्वावरील अंधनिष्ठेमुळे कम्युनिस्ट आणखी एका प्रकारें या भूमीचे अहित करीत आहेत. गेलीं कांहीं वर्षे त्यांनी घातपाती चळवळीचा अवलंब करूंन लोकशाहीच्या मूलभूत कल्पनाच झुगारून दिल्या आहेत. वास्तविक महात्माजींनीं सत्याग्रहाचा किंवा व्यवहारतः निःशस्त्र प्रतिकाराचा मार्ग या भूमीच्या स्वातंत्र्याच्या लढ्यांत यशस्वी करून दाखविल्यानंतर कांहीं भारतीयांनी अन्य मार्गाचा अवलंब करावा हे खरोखर दुर्दैव होय. अंतिम लढा सशस्त्र होईल की निःशस्त्र याविषयीं कितीहि मतभेद असले, तरी प्रारंभीचे लोकजागृतीचे लढे हे या एकाच मार्गाने यशस्वी होतील, निदान स्वकीय सरकाराविरुद्ध जो लढा करावयाचा तो आचार्य जावडेकरांनी रूढ केलेल्या शब्दप्रणालीअन्वये सत्याग्रही समाजवादी पद्धतीनेंच करणे अत्यंत श्रेयस्कर होय, याविषयीं कोणाचें दुमत होईल असे वाटत नाहीं. खरोखर लोकशाही समाज व लोकायत्त शासन निर्माण करूं पहाणाऱ्या राष्ट्राला महात्माजींनी सत्याग्रह हे जे शस्त्र दिले आहे त्याला दुसरी तोड नाही. लोकशाहीच्या सर्व व्यवहारांची व लोकायत्त शासन लोकांच्या नियंत्रणाखाली सतत ठेवण्याच्या उपायांची ज्यानें स्वतःच्या मनाशीं चिकित्सा केली असेल, त्यालाच महात्माजींच्या या अलौकिक कार्याची महती यथार्थपणे कळू शकेल. जगाच्या लोकशाहीचा इतिहास लिहितांना गांधीपूर्वयुग व गांधीउत्तरयुग असे त्या इतिहासाचे दोन भाग पाडावे लागतील इतके सत्याग्रही समाजवादाचे महत्त्व आहे. लोकायत्त शासन बदलण्यास मतप्रचारानें बहुमत आपल्या बाजूस करून घेणे हा एकच शांततेचा उपाय आजपर्यंत जगाला माहीत होता. तो फसला तर सशस्त्र क्रांतीखेरीज दुसरा मार्ग नव्हता. पण सशस्त्र क्रांतींत लोकशाहीचा बहुधा बळी पडतो; म्हणून तो उपाय अवलंबिणे फार धोक्याचें असतें. सत्याग्रह हा मार्ग दाखवून महात्माजींनी ही कोंडी फोडून टाकली आहे आणि