पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२९
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

विषाद वाटतो. कारण भारतीय लोकसत्तेच्या दृष्टीने कम्युनिस्टांच्या कार्याचें मूल्य माझ्या मते जवळजवळ शून्य आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे पुष्कळसे तत्त्वज्ञान, धोरण व कृति ही या प्रगतीला मारकच झाली आहेत; आणि याचे प्रधान कारण म्हणजे सोव्हिएट रशियाची व मार्क्सवादाची त्यांनीं पत्करलेली गुलामगिरी हे होय.
 कम्युनिस्ट तत्त्वज्ञान हे विश्वव्यापक बैठकीवर उभारलेलें आहे. राष्ट्रभेद ते जाणीत नाहीं. धर्मभेद, पंथभेद तर मुळींच नाहीं. सर्व जगांतील कामगारांची एक संघटना हे त्याचें ब्रीदवाक्य आहे. मार्क्स, एंगल्स व पुढे लेलिन स्टॅलिन यांनी स्थापलेल्या संस्थांना फर्स्ट इंटरनॅशनल, सेकंड, थर्ड इंटरनॅशनल अशी नांवें होतीं. धर्मभेद, राष्ट्रभेद, वंशभेद हे सर्व भांडवलदारांनीं निर्मिलेले आहेत आणि त्यांच्या पलीकडे जाऊन म्हणजे धर्म, राष्ट्र, वंश हे कांहीं न मानतां अखिल जगतांतल्या कामगारांनी एक व्यापक संघटना उभारावी अशी कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाची आज्ञा आहे. रशियन क्रांतीच्या लाटांबरोबर हेहि तत्त्वज्ञान जगभर पसरलें व प्रत्येक देशांतील तरुण याच धोरणानें कार्य करूं लागले. प्रत्यक्षांत खरोखरच असे कांहीं घडले असते तर जगांतील युद्धे टळून मानवजातीचा दुःखभार हलका झाला असता यांत शंकाच नाहीं; पण थोर तत्त्वांची जी नेहमीं वासलात लागते तीच याचीहि लागली. धूर्त लोकांनी ते स्वार्थासाठी राबवावयाचे आणि भोळ्याभाबड्यांनी उदात्त तत्त्वाचे आपण आचरण करीत आहोत, या सुखद भावनेत गुंग होऊन बळी जायचें, असाच सर्व थोर तत्त्वांचा इतिहास असतो. हिंदुस्थानांतील कम्युनिस्ट नेते दुसऱ्या वर्गात पडले आणि त्यांनी स्वतःला व देशहिताला सुखाने बळी दिले.

सोव्हियेट रशियाचें दास्य

 वास्तविक १९२६ सालींच स्टॅलिननें 'राष्ट्रमर्यादित समाजवाद' 'सोशॅलिझम इन् ए सिंगल कंट्री' हे धोरण जाहीर करून आंतरराष्ट्रीयत्वाचा व जगव्यापकतेचा बळी दिला होता. तेव्हांपासून त्याचे प्रत्येक कृत्य कट्टर राष्ट्रवादी धोरणाने प्रेरित झालेलें होतें. १९३८ सालीं जगांतील कामगारांशीं दगाबाजी करून त्याने मार्क्सवादाचा कट्टा शत्रू हिटलर