पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२८
भारतीय लोकसत्ता

वर्षांच्या काळेपाण्याच्या शिक्षा दिल्या, पण पुढे आंतरराष्ट्रीय दडपणामुळे या शिक्षा बऱ्याच कमी करण्यांत आल्या. कामगारांचे नेते अशा रीतीने तुरुंगांत गेल्यामुळे चळवळ बरीच विस्कळित झाली, पण थंडावली नाहीं. फुटीरपणे शेकडों कारखान्यांत संप होतच राहिले व कांहीं ठिकाणी त्यांचें प्रमाण वाढलेहि. त्यामुळे १९३४ साली कम्युनिस्ट पक्षच सरकारने बेकायदा ठरवून या चळवळीवर प्रचंड आघात केला. तरी गुप्तपणे भूमिगत होऊन कम्युनिस्टांनी आपली चळवळ चालू ठेवली होती. १९४२ साली त्यांनी युद्धकार्यांत ब्रिटिशांना साह्य करावयाचे ठरविल्यामुळे त्यांच्यावरील बंदी उठली व त्यांच्या कामगारसंघांच्या संख्याहि वाढू लागल्या; पण युद्धसमाप्तीनंतर रशियानें ब्रिटनविरोधी धोरण अवलंबितांच येथील कम्युनिस्टांनी पुन्हां आपले धोरण बदलले. आणि यावेळी त्यांनी अत्यंत भयानक अशा घातपाती चळवळीचें धोरण स्वीकारले. यामुळे काँग्रेस सरकारने त्यांच्या विरुद्ध हत्यार उपसून कम्युनिस्ट पक्षाची पाळेमुळे खणून काढण्याचा निश्चय केला व तशी मोहीमहि सुरू केली. सध्यां बाह्यतः तरी हा पक्ष नामोहरम झाल्यासारखा दिसत आहे.
 भारतांतील कम्युनिस्ट पक्षाच्या गेल्या ३० वर्षांच्या इतिहासाची रूपरेखा ही अशी आहे. या देशाच्या एकंदर प्रगतीच्या दृष्टीने आणि येथल्या लोकशाहीच्या दृष्टीनें त्या इतिहासाचा व कम्युनिस्टांच्या कार्याचा विचार केला, तर मन निराशेनें व्याप्त होते. त्याग, धैर्य, साहस या गुणांत हे लोक, किंवा निदान यांचे प्रारंभींचे नेते कमी होते असे मुळींच नाहीं. तरुण स्त्रीपुरुष जनसेवेच्या ज्या उदात्त भावनेने प्रेरित होतात त्याच भावनेनें डांगे, मिरजकर, निंबकर व त्यांचे इतर प्रांतांतले अनेक सहकारी प्रेरित झाले असले पाहिजेत. मार्क्सचें तत्त्वज्ञान अभ्यासून त्याचा कामगारांत प्रसार करण्यासाठी त्यांनी जे कष्ट केले, त्यांत स्वार्थी हेतूचा मागमूस सांपडणे त्यावेळी तरी शक्य नव्हते, अजूनहि लढा करण्याची त्यांच्या अंगांतली रग पाहिली, तुरुंगामध्ये ज्या बेडर व साहसी वृत्तीने ते प्रतिकार करतात तिची वर्णने वाचली म्हणजे त्यांच्या त्या आंतरिक प्रेरणेबद्दल मोठा विस्मय व कौतुक वाटते. आणि त्यामुळेच मनाला अतिशय खेद होतो, त्याग, साहस, धैर्य समाजहितबुद्धि हे मानवत्वाचे अलौकिक गुण केवळ वायां जावे याचा मनाला