पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(भारतीय लोकसत्ता व समाजवाद)
मार्क्सप्रेरित दोन पक्ष


 मार्क्सप्रणीत समाजवादी चळवळी या प्रामुख्यानें गिरणीकारखान्यांतील कामगारांच्या चळवळी असतात. हा कामगारवर्ग अत्यंत पुरोगामी, जागृत व संघटित असून सध्यांच्या जगांत समाजवादी क्रांति घडवून आणण्याचें सामर्थ्य फक्त त्याच वर्गाच्या अंगी आहे आणि क्रांतीचे नेतृत्व करण्यास फक्त तोच वर्ग समर्थ आहे, असा मार्क्सवादाचा सिद्धान्त आहे. सध्यां कष्टाळू जनतेचा उल्लेख करतांना शेतकरी व कामकरी असा जोडीने उल्लेख केला जातो. गरीब शाळाशिक्षक व कारकून यांचीहि या समाजांत कोणी गणना करतात. पण शुद्ध मार्क्सवादान्वयें नव्या समाज रचनेचा सर्व भार गिरणी- कारखान्यांतील शहरवासी कामगारवर्गावरच असतो. असा हा कामगारवर्ग हिंदुस्थानांत इ. स. १८७० च्या सुमारास निर्माण होऊं लागला. टाटा, ससून इ. भांडवलदारांचे कारखाने याच वेळीं सुरू झाले. अनेक इंग्रज कंपन्या याच वेळी निघाल्या व त्यांच्या कारखान्यांत काम करणारा मजूरवर्गहि तेव्हांपासूनच हिंदुस्थानांत दिसूं लागला. १८९४ सालीं हिंदुस्थानांत सुमारे ८०० कारखाने असून त्यांत साडेतीन लक्ष कामगार काम करीत होते. १९३० सालीं कारखाने ८००० असून कामगारसंख्या १५ लक्ष पर्यंत गेली होती. १९४४ साली एकंदर कामगार २५ लक्ष असून ते १४ हजार कारखान्यांत काम करीत होते. ही सर्व मोठ्या कारखान्यांची गणती आहे. लहान कारखान्यांतील कामगार यांत धरले तर हिंदुस्थानांतील एकंदर गिरणी कारखान्यांत काम करणारा वर्ग हा ३० ते ३५ लक्षांच्या आसपास जाईल.
 प्रारंभापासून या कामगारांची स्थिति अत्यंत हलाखीची होती, त्यांचे पगार असेच असत की त्यांतून पोटभर अन्न, वस्त्र व इतर जीवनावश्यक वस्तु मिळणे अशक्य होते. एकेका खोलीत आठदहा माणसे रहावयाची,