पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२४
भारतीय लोकसत्ता

सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी कारखान्यांतून राबावयाच आणि संध्याकाळी सर्वांनी मिळून एक ते दीड रुपयांची रक्कम घरीं आणावयाची! यांतच अज्ञान, रोगराई, व्यसने यांची भर पडून या कामगारांचें जीवन म्हणजे जिवंत नरकयातना होत असत. ब्रिटिश ट्रेड युनियन काँग्रेसचें वृत्त, व्हिटले कमिशन, आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेतील भारताचे प्रतिनिधि एस्. व्ही. परुळेकर व इंडियन टॅरिफ बोर्ड यांनी दिलेले अहवाल, यांवरून हें स्पष्ट कळून येतें आणि त्यावरून हेहि दिसून येतें कीं याच वेळी पुष्कळशा कंपन्या शेकडा ४० पर्यंत नफा वाटीत असून कांहीं कंपन्या शेकडां २०० ते ३०० पर्यतहि भागीदारांना नफा देत असत !
 अशा स्थितीतहि सध्यांच्या काळांत ज्यांना आपण कामगारचळवळी व कामगार संघटना म्हणतो त्यांचा १९१८ पूर्वी म्हणजे रशियन क्रान्तीची प्रेरणा मिळेपर्यंत उदय झाला नव्हता. १८७७ सालीं नागपूरच्या एम्प्रेस मिलमध्ये पगारवाढीसाठी संप झाल्याची नोंद आहे. १८८४ साली लोखंडे नांवाच्या गृहस्थानें मुंबईच्या कामगारांची एक संघटना निर्माणहि केली होती. पण तिचे रूप फार शिथिल होते व ती पुढे टिकलीहि नाहीं. त्यानंतर काँग्रेसच्या प्रयत्नाने देशांत राष्ट्रीय भावनेचा प्रसार होऊं लागला. त्याच्या लाटा कामगारांपर्यंत अल्प प्रमाणांत जाऊन पोचत असत. त्यांच्यांत कांहींशी जागृतीहि होत होती. पण ती वर्गीय भावनेची जाणीव नव्हती. कामगार ही स्वतंत्र शक्ति आहे, हाच वर्ग क्रांतीचा नेता आहे, या कल्पना तर कोणाच्याहि मनांत, स्वतः कामगाराच्याहि मनांत, उदित झाल्या नव्हत्या. त्यामुळे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने त्यांच्या संघटनांकडे कोणी कधीं लक्ष दिलें नाहीं. देशाचा मुख्य कणा म्हणजे शेतकरी. त्यांच्या चळवळीकडेहि टिळकांखेरीज कोणी राजकीय दृष्टीने पाहिले नाहीं. मग ज्यांच्या अस्तित्वाची फारशी जाणीवहि काँग्रेसच्या नेत्यांना नव्हती त्या कामगारांच्या संघटनांचे नांव कशाला ? आणि त्यांत विपरीत असे कांहीं नव्हतें. कारण त्यावेळी अखिल हिंदुस्थानांत कामगारांची संख्या ५| ६ लाखांच्या वर गेली नव्हती. तेव्हां त्यांच्या स्वतंत्र प्रश्नांची व सामर्थ्याची जाणीव कोणास झाली नसली तर त्यांत कांहीं नवल नाहीं. टिळकांना ही जाणीव होऊन त्यांनीं कामगारांत जागृति करण्यास प्रारंभ केला होता, असा उल्लेख 'ग्रेट मेन