पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२२
भारतीय लोकसत्ता

कल्पना येऊन अशा होत नसतात. आज तीस वर्षांनी नंतरच्या घडामोडी पाहून त्या जमेस धरून टीकाकार टीकेला प्रवृत्त होतो. आणि त्या ज्ञानाचा आरोप तीस वर्षांपूर्वीचा माणसांवर करून त्यांना इमारत बांधणाऱ्या इंजिनियराप्रमाणे जबाबदार धरतो. मागल्या काळाकडे अशा पद्धतीने पहाणे अशास्त्रीय व अयुक्त आहे. ठेंचा खात, चाचपडत, हातांतल्या काठीनें खाचखळग्यांचा अदमास घेतच मानवी जीवनाचा प्रवास चाललेला असतो. म्हणून ज्यांनीं आपले सर्वस्व पणाला लावून राष्ट्रीय चळवळी केल्या त्यांच्यावर स्वार्थी हेतूंचा आरोप करण्यापूर्वी दहा वेळां विचार करणे अवश्य असते, वादविवादात पंडितजींनी कडक टीका केली व काँग्रेसजनांनी हिरीरीनें आत्मसमर्थन केले तरी ते दोन्ही अभिनिवेश सोडून आपण विचार करणे अवश्य आहे. तसा विचार केला तर दोन लढे एकदम झेपणार नाहीत, या विचाराने काँग्रेस राष्ट्रवादी भूमिका दृढपणें धरून बसली होती व आपल्या सामर्थ्याची वाढ होत आहे, कालाचा प्रवाह बदलत आहे, असे हळूहळू ध्यानीं येतांच तिनेहि समाजवादाकडे पावले टाकण्यास सुरुवात केली असें दृश्य आपणाला दिसू लागते. पंडित जवाहरलालजी, आचार्य नरेन्द्र देव, जयप्रकाश नारायण यांनाच त्याचे पुष्कळसे श्रेय आहे हे खरें; पण महात्माजीहि आपली भूमिका सोडण्यास तयार झाले होते, असे स्पष्ट दिसतें. आणि जमीनदारभांडवलदार यांनी आपला उपदेश मानला नाहीं तर, 'सत्याग्रह व असहकारितां या मार्गानें मी त्यांच्याशी लढेन' हें आपले आश्वासन त्यांनीं खरें करून दाखविलें असतें, यांत शंका वाटत नाहीं. तसे झाले असते तर आजचा भारताचा इतिहास फारच निराळा झाला असता. पण तसे घडलें नाहीं. त्याचे महात्माजींच्या मृत्यु हें तर एक कारण आहेच; पण इतरहि अनेक कारणे आहेत. त्या कारणांचा विचार करावयाचा म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतीय लोकशाहीचे विवेचन करणे अवश्य आहे. पण तत्पूर्वी कम्युनिस्ट व समाजवादी या पक्षांच्या कार्याचे भारतीय लोकसत्तेच्या दृष्टीने मूल्यमापन करावयाचे आहे. स्वातंत्र्योत्तर 'घडामोडीचे त्यावांचून नीट आकलन होणार नाहीं. म्हणून त्यांचा परामर्ष घेऊन मग १९४७ नंतरची भारतीय जीवनाची पुनर्घटना या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळू.