पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२१
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

व्यापारी दळणवळण या धंद्यावर सरकारचे नियंत्रण किंवा मालकी असावी' असा थोडासा समाजवादी स्वरूपाचा एक ठरावहि मंजूर केला. १९४५ सालीं जो निवडणुकांचा जाहिरनामा काँग्रेसनें प्रसिद्ध केला त्यांत तर समाजवादाची जवळजवळ सर्व तत्त्वें मान्य करण्यांत आली आहेत. 'राजकीय स्वातंत्र्य हें सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्यावांचून फोल आहे व तें प्रस्थापित करण्यासाठी सर्व महत्त्वाचे उद्योगधंदे राष्ट्राच्या स्वामित्त्वाचे असले पाहिजेत,' अशी काँग्रेसने निःसंदिग्ध घोषणा केली आहे. महात्माजींचे मतहि कांहीं वर्षांनी थोडें बदलले होतें. २ आगष्ट १९४२ च्या हरिजनमध्ये यांनी म्हटले आहे की 'धनिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव झाली तर ब्रिटिश सत्ता सहज नमेल. पण त्यांच्याविषयी माझी निराशा झाली आहे. म्हणूनच तर मी जनताजागृतीच्या मार्गास लागलो.' १९३४ साली समाजवादी पक्ष स्थापन झाल्यावर त्याला बाहेर हुसकून काढण्याचे अनेक कॉंग्रेसनेत्यांनीं प्रयत्न केले; पण महात्माजींनीं तो पक्ष काँग्रेसमध्ये रहावा असाच आपला निर्णय दिला; व त्याचे कारणहि अगदीं समर्पक असे दिलें, 'व्यक्तीच्या शरीरांत जे रुधिराभिसरणाचे महत्त्व तेच राष्ट्राच्या शरीरांत विचाराभिसरणाचें आहे' असे त्यांचे उद्गार आहेत. (हरिजन १४ जुलै १९४६). १९४७ मध्ये कृपालानींनीं अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचें अध्यक्षपद नरेंद्रदेव किंवा जयप्रकाश यांना द्यावें असा महात्माजींचा आग्रह होता; पण कार्यकारिणीनें तो मानला नाहीं.
 या सर्व घटना व काँग्रेसच्या नेत्यांचे हे बदलते विचारप्रवाह पाहिले, म्हणजें काँग्रेस दृढपणें राष्ट्रवादाला धरून बसली होती व जमीनदार भांडवलदारांविरुद्ध लढा करण्याचे कटाक्षाने टाळीत होती याचें एकच कारण दिसते. ब्रिटिशांशी लढा चालू असतांना हा दुसरा लढा आपण सुरू करूं नये, हे दोन लढे आपणांस झेपणार नाहीत, असे वाटूनच काँग्रेस नेत्यांनी आपली भूमिका निश्चित केली होती असे वाटतें. इतर जीं आपल्या भूमिकेची समर्थने त्यांनी पुढे केली होती त्यांचे वैयर्थ्य हळूहळू त्यांनाहि पटू लागले असावे असे दिसतें. आणि दुसरीहि एक गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे. मानवाच्या घडामोडी एकाद्या प्रयोगशाळेतील प्रयोगाप्रमाणे अगदी रेखीव मार्गानें, नियोजनपूर्वक, भावी परिणामांची अगाऊ