पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२०
भारतीय लोकसत्ता

जात आहेत. या नेत्यांचे उदात्त असें पूर्वचरित्र पाहिले म्हणजे या आरोपांच्या सत्यतेविषयीं जबर शंका येते. माझ्या मते फ्रान्स, जर्मनी येथल्याप्रमाणे भांडवलदारापुढे ते हतबल झाले असावेत आणि म्हणूनच असे वाटतें कीं, काँग्रेसनें १९२० सालापासूनच किसान- कामगार संघटनेकडे लक्ष घालून ती महाशक्ति आपल्या पाठीशी घेतली असती तर आज तिची विकल अवस्था झाली नसती. यासाठी राष्ट्रवादी भूमिका सर्वस्वीं सोडून देण्याची आवश्यकता नव्हती. ती दृढ धरूनच ज्याप्रमाणे स्पृश्यास्पृश्य व हिंदुमुसलमान हे कलह आधीं मिटविणे अवश्य असा काँग्रेसने आग्रह धरला होता त्याचप्रमाणे धनिक व कष्टाळू जनता यांच्या विषयीं धोरण ठेवलें असतें तर आजचा प्रसंग टळला असता असे वाटते.
 पंडित जवाहरलाल, जयप्रकाश नारायण व त्यांचा समाजवादी पक्ष यांच्या सतत प्रचारानें व प्रयत्नानें १९४७ पर्यंत काँग्रेसची पावले कांहींशीं समाजवादाकडे पडत होतीं असे मागल्या इतिहासावरून दिसून येते. १९२९ सालीं प्रथम काँग्रेस कमिटीने महात्माजींना अध्यक्ष म्हणून निवडले होते. पण त्यांनीच आग्रह धरून पंडित जवाहरलाल यांना अध्यक्षपद देण्यास कमिटीला भाग पाडले. त्यावेळी पंडितजींचीं समाजवादी मतें अगदीं जगजाहीर झालीं होतीं. महात्माजींनी आपल्या पत्रांत तसा उल्लेखहि केला आहे. तरी राष्ट्रकार्याची धुरा त्यांच्याच खांद्यावर द्यावी हा आग्रह त्यांनीं धरला व काँग्रेसनें तो मान्य केला. अध्यक्षीय भाषणांत पंडितजींनी, 'मी स्वतः समाजवादी आहे. राजे व संस्थानिक यांच्यावर माझा काडीइतकाहि विश्वास नाहीं.' असें आरंभीच सांगून टाकले; तरी महात्माजींचा त्यांच्यावर रोष झाला नाहीं. पुढे १९३६ साली पुन्हां पंडितजी अध्यक्ष झाले. त्यावेळींहि त्यांनीं पुन्हां अशींच भाषणे केली. आतां तर त्यांची जहाल मतें सर्वांच्याच परिचयाची झालीं होतीं. समाजवादी पक्षाची स्थापनाहि आतां झाली होती. व पंडितजी त्या पक्षाला मिळाले नसले तरी त्यांनी कार्यकारिणीत जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव, अच्युत पटवर्धन या अस्सल समाजवाद्यांना स्थान दिले होते. ठरावाच्या रूपानेंहि काँग्रेस कांहींशी समाजवादी होत होती. कराची काँग्रेसनें कामगारांच्या हिताचे ठराव केले व 'खनिजसंपत्ति, रेल्वे, जलमार्ग, जहाजे व सार्वजनिक