पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१९
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

पुन्हां तोच प्रसंग आला होता, पण तेथील सर्वच वर्ग समंजस असल्यामुळे त्यांनी समाजवादाची प्रस्थापना करून आपली लोकसत्ता टिकवून धरली आहे. फ्रँकलिन रूझवेल्ट अमेरिकेत १९३२ साली प्रथम अध्यक्ष झाले त्यावेळी अमेरिकेवर अशीच आपत्ति आली होती. संपत्तीचा निचरा करून रूझवेल्ट यांनी फ्रेंच राज्यक्रांतीसारखा अमेरिकेवर येऊ पाहणारा महाभयंकर उत्पात टाळला व तेथील लोकसत्ता तारिली, असे इतिहासकार सांगतात. फ्रान्स, जर्मनी, इटली येथल्या लोकसत्ता बुडाल्या व तीं राष्ट्रेहि पराभूत झाली. याच्या अनेक कारणांपैकी तेथील भांडवलदार- जमीनदारांचा कमालीचा स्वार्थ हें एक कारण निश्चित आहे. पेटां, लावल यांनी तर मायभूमीचा विक्राच केला. समाजवाद येऊं नये हेच या देशांतील सर्व नेत्यांचे उद्दिष्ट होते. त्यामुळे त्यांच्या देशांत लोकसत्ता समर्थ अशी कधीं झालीच नाहीं. भारतीय जनतेनें, येथील भांडवलदार- जमीनदार या धनिकवर्गानें व येथील नेत्यांनी इतिहासाचे हे पाठ फार काळजीपूर्वक पाहिले पाहिजेत. नाहीं तर येथील लोकसत्तेची तशीच धूळधाण होईल.
 १९२० ते ४५ पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व ज्यांचेकडे होतें त्यांच्या मनांत, आर्थिक विषमता ही लोकसत्तेला घातक होते, हे सत्य दृढमूल झालेले होते यांत शंका वाटत नाहीं. वल्लभभाई पटेल, पट्टामि, कृपलानी, या सर्वांचा उद्घोष तसा होता. महात्माजींच्या तर जीविताची ती प्रतिज्ञाच होती. पण या सर्वांनी आर्थिक समतेच्या प्रस्थापनेसाठी जे मार्ग निश्चित केले ते अगदींच भ्रांत, अव्यवहारी व फलशून्य असे होते याविषयी आज तरी दुमत होईल असे वाटत नाही. धनिकांचा हृदयपालट होण्याचा संभव कितपत आहे, निधिधारकत्वाचें तत्त्व ते कितपत मानतील, वर्णाश्रमधर्मांचे पुनरुज्जीवन करणे व केले तर ते फलदायी होणे कितपत शक्य आहे, याचा वाचकानींच आपल्या ठायीं शांतपणे विचार करावा. किसानकामगारसंघटना व त्या संघटनांचा राजकीय लढ्यासाठी उपयोग करणे हेहि किती अवश्य व हितावह आहे ते आजच्या परिस्थितीवरून कळून येईल. आज आपला देश सर्वस्वीं धनिकांच्या आहारी गेला आहे. या वेळी काँग्रेसच्या नेत्यांवर लोक वाटेल ते आरोप करीत आहेत. तेच धनिकांना सामील आहेत व जनतेची फसवणूक करीत आहेत, असे अत्यंत काळे आरोप त्यांच्यावर केले