पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१७
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

चाटले नाहीं, असें सांगून गांधीजींनीं 'अन्यायानें कोणी तुमची मालमत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या वतीने लढेन' असे जमीनदारांना कानपूर येथें १९३४ सालीं आश्वासन दिले. त्यावर पंडितजी फारच चिडून गेले. 'जमीनदारी जर इतकी आवश्यक आहे तर गांधीजी ती गुजराथेत सुरू करतील काय?' असा प्रश्न त्यांनीं आत्मचरित्रांत विचारला आहे. (पृ. ५४०). जमीनदारीची दुःखे परस्पर संयुक्तप्रांत, बंगाल, बिहार येथील जनतेला भोगावी लागत आहेत, म्हणून गांधीजींना त्यांची आंच नाहीं, हा जो या टीकेतील भावार्थ तो जरा अन्यायाचा आहे असे वाटते. पण त्यावरून काँग्रेसचा राष्ट्रवाद व नवीन उदयास आलेला समाजवाद यांतील मतभेदांचें स्वरूप किती कटु होते ते कळून येईल व लोकशाहीच्या दृष्टीने त्यांचें मूल्यमापन करणे सुलभ होईल.
 आर्थिक क्रांति व वर्गकलह यांची भाषा काढली की तो मार्ग हिंसामय आहे असे म्हणून काँग्रेसजन त्याचा निषेध करीत व अजूनहि करतात. यावर पंडितजींनी प्रखर टीका केली आहे. त्यांच्या मतें अहिंसेला जें अपरिवर्तनीय अशा वेदवाक्याचें स्वरूप देण्यांत आले आहे ते अगदीं अश्लाघ्य आहे. त्यामुळे अहिंसेतील सामर्थ्य नष्ट होऊन 'अहिंसा हें (जनतेच्या हातांतील प्रभावी शस्त्र होण्याऐवजी) वरिष्ठ वर्गाच्या हातांतील ब्रह्मास्त्र झाले आहे व सद्यःस्थिति सनातन रहावी म्हणून त्याचा उपयोग करण्यांत येऊ लागला आहे ' (पृ. ५५३) असे सांगून 'हिंसा टळावी म्हणून हिंसेपेक्षांहि अनिष्ट अशा गोष्टींपुढे मान तुकविण्याची वृत्ति आपण धारण करतां कामा नये.' असा इषारा त्यांनी दिला आहे. (आत्मचरित्र पृ. ५५७)
 काँग्रेसचा राष्ट्रवाद पंडितजींना अमान्य होता असे नाही. त्याची थोरवी ते जाणून होते आणि त्या तत्त्वाला अनुसरून ते काँग्रेसच्या ध्वजाखाली लढले; पण या लढ्यांतून जे स्वातंत्र्य मिळवावयाचें तें खरेखुरे जनतेचें स्वातंत्र्य असले पाहिजे, अशी त्यांची मनीषा होती. काँग्रेसच्या इतर नेत्यांची मनीषा तीच होती. पण धनिकांच्या व कष्टकरी जनतेच्या हितसंबंधांचा समन्वय अशक्य आहे हें पंडितजींच्या ध्यानांत आल्यामुळे काँग्रेसचे प्रयत्न त्यांना अर्थशून्य वाटू लागले. त्यांच्या मतें 'हा आग्रह आपाततःच असमर्थनीय