पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१६
भारतीय लोकसत्ता

झाले असतें. पंडितजींना प्रारंभी आपण महात्माजींना समाजवादी मार्गावर आणूं अशी फार आशा होती. पण गांधीजीचे ध्येय व समाजवाद्यांचे ध्येय यांच्यामध्ये मूलतः भेद आहेत ही गोष्ट लवकरच त्यांना कळून चुकली. (आत्मचरित्र पृ. २६१) हा भेद इतका कमालीचा तीव्र होता व गांधीजींचीं या बाबतींतील मतें व वर्तन इतकें विपरीत होते की पंडितजींना त्यांची पराकाष्ठेची चीड येत असे. १९३३ साली एका वर्तमानपत्रांत गांधीजींनी जवाहरलालजींच्या कार्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे उद्गार काढले ! आणि काँग्रेसच्या नांवानें पंडितजी या नव्या विचारसरणीचा प्रचार करणार नाहींत, असा त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वास प्रगट केला, इतकेंच नव्हे तर जमीनदारीपद्धति समाजरचनेंत अवश्य आहे असे सांगून तिचे समर्थनहि केलें. पंडितजी म्हणतात की, 'माझ्याबद्दलचा उल्लेख मला पसंत पडला नाहींच, पण जमीनदारी पद्धतीचे त्यांनी जे समर्थन पुढे मांडले होतें ते वांचून माझें डोकें बरेंच गरम झालें.' (पृ. ४८०) शेतकरी- कामकरी यांच्याविषयींच्या महात्माजींच्या चमत्कारिक मतांचें कोडें पंडितजींना कधींच उलगडलें नाहीं. ते म्हणतात, 'गांधीजी म्हणजे एक कोडें आहे. विसंगतीचें एक उदाहरण आहे. पददलित माणसाविषयी ज्याला इतके गाढ प्रेम व आस्था वाटते त्यानें पददलित वर्ग हमखास उत्पन्न करणाऱ्या व त्याला पिसून काढणाऱ्या समाजरचनेला पाठिंबा द्यावा हे कसे ? अहिंसेचा जो मोठा कैवारी त्यांनेंच निर्भेळ हिंसा व दडपशाही यांवर आधारलेल्या सामाजिक व राजकीय संस्थांना मान्यता द्यावी हा काय न्याय ? गांधीनी स्वत:ला कधीकधीं समाजवादी म्हणवितात. पण व्यवहारांत समाजवाद या शब्दामुळे ज्या आर्थिक घटनेचा बोध होतो तो त्यांच्या व्याख्येत बसत नाहीं. त्यांच्या मागोमाग बऱ्याच प्रमुख काँग्रेसकार्यकर्त्यांनींहि त्या शब्दाचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. पण त्यांच्या तोंडी असणाऱ्या समाजवादाचा भूतदयावादाचें कडबोळे एवढाच अर्थ करतां येईल.' (पृ. ५१९). काँग्रेसचे नेते व गांधीजी यांनी जमीनदार भांडवलदार यांचे जे समर्थन चालविले होते त्यांचा पंडितजींना इतका संताप येत असे कीं, एकदोनदां किंचित् तोल जाऊन त्यांनी त्यांवर टीका केली आहे. संयुक्त प्रांत, बंगाल, बिहार येथील जमीनदारी नष्ट व्हावी असे आपल्याला कधींच