पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०९
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

जाई. त्या वेळीं सत्याग्रह व असहकारिता या मार्गाने लढा करून त्यांना नमवावयाचे, असा मार्ग ते सांगत. पण ब्रिटिशांशी लढा चालू असेपर्यंत या मार्गाचा अवलंब करावयाचा नाहीं, असें त्यांचे धोरण होतें. 'आजच आपण भांडवलदारांविरुद्ध कामकऱ्यांना चेतविलें तर तो कमालीचा मूर्खपणा होईल. सरकार याचा नेमका फायदा घेऊन एका वर्गाविरुद्ध दुसऱ्याला झुंजवीत ठेवील व त्यामुळे त्याची मगरमिठी जास्तच दृढ होईल. असें आपले धोरण असहकारितेच्या चळवळीच्या प्रारंभीच त्यांनी जाहीर केले होते. (यंगइंडिया २०-४-२१). 'आपण ब्रिटिश साम्राज्याशी लढत आहों, तोपर्यंत जमीनदारांविरुद्ध लढा निर्माण करण्याची जरूर नाहीं, या दोघांत (ब्रिटिश व जमीनदार यांच्यांत) अगदींच भेद नाहीं असें मानूं नये, त्यांच्यांतील भेद स्पष्ट आहे.' हा विचार ते पुन्हां पुन्हां सांगत. (यंगइंडिया २६-११-३१) आणि ब्रिटिशांविरुद्ध मोहीम चालू असेपर्यंत हृदयपरिवर्तनाचा मार्गच अवलंबावा व जमीनदाराविरुद्ध चळवळ होऊं देऊं नये, असा महात्माजींचा कटाक्ष होता. कित्येक वेळां सुरू झालेल्या किंवा होऊं घातलेल्या किसानकामगारांच्या अशा चळवळी बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
 काँग्रेसने कामगारांच्या संघटना करण्याच्या कामांत कधीहि लक्ष घातले नाहीं याचे कारणहि अशाच स्वरूपाचें होतें. काँग्रेसला भांडवलदारच्या विरुद्ध लढा करावयाचा नव्हता आणि कामगारसंघटनांचा राजकीय क्षेत्रांत उपयोग नाहींच करावयाचा, असा महात्माजींचा निश्चय होता. एकदां ही प्रथा सुरू झाली म्हणजे या शक्तीचा वाटेल तो दुरुपयोग होणे शक्य आहे असें संघटना न करण्याचे ते कारण देत. (यंग इंडिया २०-४-२१, शापुरजी- गांधी पत्रव्यवहार पृ. २५) १९१८ सालीं अहमदाबादेस एकदांच फक्त कामगारसंघटनेचा महात्माजींनी प्रयोग केला. तो यशस्वीहि झाला होता; पण पुन्हां त्या मार्गास ते गेले नाहींत. याचे कारण वरीलप्रमाणे आहे. १९४० सालीं कायदेभंग सुरू करण्याचा विचार रामगड काँग्रेसमध्ये चालू होता. त्यावेळीं, कायदेभंग सुरू होतांच अखिल कामगारवर्ग संप
 भा. लो.... १४