पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०८
भारतीय लोकसत्ता

जनतेच्या कल्याणासाठी करावा, असा ते त्यांना उपदेश करीत. त्यांनी तसे केले नाहीं तर सर्व समाजाचा नाश होईल व ते गुन्हेगार ठरतील, असेंहि ते त्यांना बजावीत; पण या तऱ्हेचा उपदेश कितीहि वेळां ते करीत असले आणि आपलीं हीं मतें जरी वारंवार त्यांनी प्रगट केली असली, तरी वर्गकलहाला त्यांची मुळींच मान्यता नव्हती. जमीनदारभांडवलदार यांच्याविरुद्ध कोणी वर्गकलह पेटविला तर मी आपली सर्व शक्ति खर्च करून तो बंद पाडीन, असें ते निक्षून सांगत. 'तुमच्या जमिनी कोणी अन्यायानें हिरावून घेऊं लागला तर मी तुमच्या बाजूने लढा करीन असे संयुक्त प्रांताच्या जमीनदारांना त्यांनी आश्वासन दिले होते. (अमृतबझार पत्रिका २-८-३४) श्रीमंतांच्या- जमीनदार- भांडवलदारांच्या- सद्बुद्धीवर त्यांची श्रद्धा होती. इतरांप्रमाणेच त्यांच्या ठायींहि राष्ट्रभक्ति असून उच्च प्रेरणांचे आवाहन त्यांच्या मनालाहि पोचूं शकते असा ते निर्वाळा देत. ते सर्वस्वी स्वार्थी आहेत, असे मानणे हा त्यांना अन्याय असून त्यामुळे जनतेचेंच अहित होईल, असें त्यांचे मत होतें. आणि म्हणूनच निधिधारकत्वाच्या कल्पनेची लोकांनीं कितीहि टवाळी केली, तरी त्यांचा तिच्यावरील विश्वास अढळ होता. (अ. ब. पत्रिका २-८-३४). जमीनदार- भांडवलदार यांचे धन हिंसामय मार्गाने हिरावून घेण्यास तर महात्माजींचा विरोध होताच, पण अहिंसामय हृदयपरिवर्तनाच्या मार्गाने त्यांचे स्वामित्व नष्ट करणे हेहि त्यांना मान्य नव्हते. श्रीमंत वर्ग हा समाजाला अवश्य आहे, रामराज्यांतहि हे भेद रहाणारच, श्रीमंतांच्या खाजगी मालमत्तेचें रक्षण केले पाहिजे, वैयक्तिक स्वामित्वाचं तत्त्व समाजाला मारक नसून पोषकच आहे, अशी त्यांची मते होतीं. 'धनिकवर्गच नष्ट केला तर, अमाप संपत्ति मिळविण्याचे जे कौशल्य त्याला समाज मुकेल आणि त्याची पातळी खालावेल. तेव्हां राजे, संस्थानिक, जमीनदार यांना खालसा करण्यास मी कधींहि संमति देणार नाहीं.' हे त्यांनीं अगदी निःसंदिग्ध शब्दांत अनेक वेळां जाहीर केले आहे. (हरिजन २५-८-४०, यंग इंडिया ८-१-२५)
 श्रीमंतांचे हृदयपरिवर्तन झालें नाहीं व आपणांस मिळालेल्या धनाचे आपण केवळ विश्वस्त वा निधिधारक आहो असे समजण्याचें त्यांनीं नाकारले तर काय करावयाचें, असा प्रश्न महात्माजींना नेहमी विचारला