पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१०
भारतीय लोकसत्ता

पुकारील, असे जयप्रकाशांनीं आश्वासन दिले; पण त्यामुळे आनंद व समाधान वाटण्याऐवजी महात्माजीना दुःखाचा धक्का बसला. यामुळे आपल्या सर्व योजना कोलमडून जातील आणि सर्वत्र गोंधळ व अराजक होईल असे त्यांनी सांगितलें व जयप्रकाशांच्या या कल्पनेचा निषेध केला. (पट्टाभि खंड २ रा, पृ. १८०)
 कामगारसंघटना व कामगारक्रांति, वर्गविग्रह, वैयक्तिक स्वामित्व, जमीनदारभांडवलदार यांचे स्थान व आर्थिक समता यांविषयी महात्माजींचीं काय मतें होतीं तें वरील विवेचनावरून कळेल. पंडित जवाहरलाल सोडून काँग्रेसच्या इतर नेत्यांची मतें जवळजवळ अशींच होती. पट्टाभि, कृपलानि, मश्रूवाला यांनी वेळोवेळी समाजवादाला कसून विरोध केला आहे. वर्गविग्रहांत हिंसा आहे हे कारण तर ते देतातच; पण याशिवाय समाजवादाला विरोध करण्यास ते आणखी एक हत्यार उपसतात. त्यांच्या मतें आर्थिक समतेच्या प्रस्थापनेसाठी प्राचीन वर्णाश्रमव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे अवश्य आहे. 'विषमता नष्ट करण्यासाठी पश्चिमेकडून- म्हणजे सोव्हिएट रशियाकडून प्रेरणा घेण्याचे मुळींच कारण नाहीं. आपल्या वर्णाश्रमव्यवस्थेत स्पर्धेला वाव नसल्यामुळे आर्थिक समतेसाठी तिचाच आश्रय करणे हितावह आहे.' असें महात्माजींचें मत होते. (अ. ब. पत्रिका ३-८-३४) व त्याचाच अनुवाद मश्रूवाला, पट्टाभि, डॉ. कुमाराप्पा, कृपालानी यांनी केला आहे.
 समाजवादाविषयीं महात्माजींची व काँग्रेसनेत्यांची अशा प्रकारची विचारसरणी होती, हे आपल्या देशाचें मोठे दुर्दैव होय, असें वाटते. त्यांच्या या मतप्रणालीमुळे कामगार व किसान हे संघटित रूपाने काँग्रेसच्या कक्षेत भर संख्येने कधी आले नाहीत आणि कामगारांच्या शक्तीची पुण्याई तर काँग्रेसला कधीच मिळाली नाहीं. ब्रिटिशांशी लढा चालू आहे, तोपर्यंत जमनिदार- भांडवलदारांशी लढा करूं नये, हे धोरण मान्य होण्याजोगे होतें. त्यालाहि दुसरी बाजू आहेच आणि अधिक विचाराअंतीं ती खरी आहे असे वाटते. कामगार संघटना करून भांडवलदारांविरुद्ध मोहीम सुरू करण्याचे काँग्रेसनें धोरण ठेविलें असते, तर कामगारांचे काँग्रेसला साह्य मिळून ब्रिटिश साम्राज्यशाहीशीं होणाऱ्या लढ्यांत तिचें सामर्थ्य वाढलेच