पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०
भारतीय लोकसत्ता

अधिष्ठान आहे, हाहि सिद्धांत त्या मूळ सिद्धांताच्या पोषणासाठींच सांगितलेला असतो. लोकशाहीचा हा जो मूळ सिद्धांत व त्याला पोषक अशीं जीं मूलभूत आदितत्त्वे त्यांचा मागमूसहि भारतांत सापडत नाहीं. वेद, ब्राह्मणे, उपनिषदे, महाभारत, रामायण, सुत्तनिपात, मंझिमनिकाय, अभिधम्मपिटक इत्यादि ग्रंथ पाहिले तर भारतांतील प्राचीन वाङ्मय सागरासारखे विशाल आहे असे म्हणावे लागेल. पण एवढ्या या प्रचंड महोदधत व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानाचीं चार वाक्यहि सापडत नाहींत. आणि राजकीय क्षेत्रांतल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा तर या वाङ्मयांत कोठें वासहि येत नाहीं. डॉ. आळतेकर, डॉ. जयस्वाल व प्रा. द. के. केळकर यांनीं आपल्या ग्रंथांत प्राचीन गणराज्यांचीं जीं वर्णने दिलीं आहेत त्यांत एतद्विषयक एक वाक्यहि अवतरून दिलेले नाहीं. डॉ. जयस्वाल यांनी नागरिकांना अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य होते असे एकदोन ठिकाणी सांगितले आहे. पण जुन्या ग्रंथांतलीं वचने वा उदाहरणे त्यासाठी दिलेली नाहींत. महाभारतांतले दोन अध्याय त्यांनी सर्वच्या सर्व उतरून दिले आहेत. त्यांत गणराज्याचे स्वरूपच वर्णिलेले आहे. पण त्यांत या मूलतत्त्वांचा उल्लेखहि नाहीं. गणराज्ये कशामुळे नष्ट होतात, त्यांच्या नेत्यांनी कोणचीं धोरणे संभाळणे अवश्य आहे इ. अनेक प्रकारचा उपदेश त्यांत आहे. लोकसत्तेच्या दृष्टीनें तो बहुमोल आहे. पण तें व्यक्तित्वाचे तत्त्वज्ञान नव्हे. चाणक्याने अनेक ठिकाणीं लोकसत्ताक पद्धतीचा निषेध केला आहे. पण त्यांत निषेधासाठींहि त्याने अशा तऱ्हेच्या विचारांचा व व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानाचा निर्देश केलेला नाहीं. श्रीकृष्ण हा आपल्या कल्पनेप्रमाणे अनियंत्रित सर्वसत्ताधारी असा राजा नसून अंधकवृष्णि संघाचा अध्यक्ष होता असे या पंडितांनी महाभारतांतील काहीं अवतरणे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. पण श्रीकृष्णाची गीता किंवा त्याची महाभारतांतील इतर अनेक भाषणे पाहिली तर त्याचा एकहि उद्गार वा एकहि वचन असे सापडत नाहीं कीं ज्यावरून लोकायत शासनाच्या मूळ कल्पना त्याच्या मनांत असतील असे वाटावे. उलट ग्रीक व रोमन वाङ्मयांत या तऱ्हेचें तत्त्वज्ञान ठायीं ठायीं सांपडते. ख्रिस्तपूर्वं ४३१ साली अथेन्सचा नेता पेरिक्लीज यानें जें भाषण केले त्याच्या एका लहानशा परिच्छेदांत लोकशाहीच्या मूल तत्त्वांचा जो निर्देश येतो तो